Tue, Feb 19, 2019 23:00होमपेज › Pune › उच्चशिक्षीत महिलेला फेसबुक,  इमेलवर अश्‍लील एसएमएस

उच्चशिक्षीत महिलेला फेसबुक,  इमेलवर अश्‍लील एसएमएस

Published On: Feb 13 2018 2:01AM | Last Updated: Feb 13 2018 1:45AMपुणे : प्रतिनिधी

एका उच्चशिक्षीत विवाहित महिलेला दीड वर्षांपासून फेसबुक व इमेलद्वारे अश्‍लील एसएमएस पाठवून तसेच तिच्याकडे लग्नाची मागणी करून विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 29 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार, जयंत पाटील या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या विवाहित असून, त्या एका खाजगी कंपनीत नोकरीस आहेत. दरम्यान यापूर्वी एका कंपनीत नोकरी करताना फिर्यादी व आरोपी जयंत पाटील यांची ओळख झाली होती. कामानिमित्त ते बोलत असत. मात्र, त्यानंतर काही दिवसांमध्येच फिर्यादी यांनी तेथील काम सोडले. मात्र, आरोपींने त्यानंतर फिर्यादी यांना फेसबुकवर एसएमएस करण्यास सुरुवात केली. याकडे त्यांनी दुर्लक्ष केले.

तो सतत एसएमएस करत असल्याने फिर्यादी यांनी फेसबुक खाते बंद केले व दुसरे नवीन खाते उघडले. तरीही त्याने फिर्यादी यांचा फेसबुक व ईमेल मिळवून त्यांना अश्‍लील भाषेत तसेच, लग्नाची मागणी करत एसएमएस करण्यास सुरूवात केली. या त्रासाला कंटाळून फिर्यादी यांनी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार याप्रकरणी विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास विश्रामबाग पोलिस करत आहेत.