Sun, Nov 18, 2018 21:53होमपेज › Pune › आता गारांचा वेग तपासणार ‘हेलपॅड’

आता गारांचा वेग तपासणार ‘हेलपॅड’

Published On: Feb 22 2018 1:24AM | Last Updated: Feb 21 2018 11:34PMपुणे : प्रतिनिधी 

राज्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर गारपीट होत असून, गारांचे मोजमाप करण्यासाठी पुण्यातील सेंटर फॉर सिटीझन सायन्स संस्थेने पुढाकार घेतला आहे. गारांचा आकार, प्रमाण, वेग तपासण्यासाठी गारा मापन यंत्राचा (हेलपॅड) वापर करण्यात येणार आहे, अशी माहिती ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी यांनी  दिली. 

कुलकर्णी म्हणाले की, थर्माकोलच्या एक फूट आकाराच्या आणि दोन ते चार मिलीमीटर जाडीच्या चौकोनावर सिल्वर पेपर लावून, गारा मापन यंत्र (हेलपॅड) तयार करता येते. गारा पडत असताना ठराविक कालावधीमध्ये हेलपॅड खुल्या जागेत ठेवायचे आहे. गारा पडल्यानंतर त्यावर गारांमुळे ठसे (खड्डे) उमटतील आणि त्यांचा आकार, संख्या, वेळेनुसार पडलेल्या गारा यावरून वेग तपासण्यात येईल. यातून मिळणारा ‘डाटा’ हा गारपीट आणि त्यापासून होणारे नुकसान तपासण्याठी उपयुक्त ठरेल. 

जगभरातील काही देशांमध्ये हे तंत्र वापरले जात असून, आपल्याकडे ते वापरले जात नाही. यंत्रणेला गारपिटीच्या वेळी प्रत्येक ठिकाणी पोहोचता येणे शक्य नाही. त्यामुळे हे तंत्र लोकांना समजावून सांगून त्यांच्याकडून माहिती गोळा केली जाणार आहे. विदर्भ, मराठवाडा, उत्तर मध्य महाराष्ट्रातील नागरिक आणि विद्यार्थ्यांना हेलपॅड तयार करण्याची माहिती देऊन गारांचे मोजमाप केले जाणार आहे. महाविद्यालयीन आणि शालेय विद्यार्थ्यांना याबाबत प्रयोग करावेत, असे आवाहनही डॉ. कुलकर्णी यांनी केले आहे. 

‘लाइटनिंग डिटेक्टर सर्किट’बनविण्याचे प्रशिक्षण

वादळी पाऊस आणि पूर्वमोसमी पावसाच्या काळात विजा पडून मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होते. वीज तयार झाल्यानंतर ढगांमध्ये संक्रमण झाल्यानंतर ती जमीनीकडे झेपावते. ढगांमध्ये तयार झालेल्या विजेची माहिती साध्या इलेक्ट्रिक सर्किटने मिळविता येते. अशी लाइटनिंग डिटेक्टर सर्किट उपकरण बनविण्याबाबत विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यातून वीज पडण्यापूर्वीच त्याविषयी माहिती मिळून संभाव्य हानी टाळता येऊ शकते, असेही डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले.