Wed, Aug 21, 2019 15:23होमपेज › Pune › लॉजमधून डॉक्टरचे रिव्हॉल्व्हर पळवले

लॉजमधून डॉक्टरचे रिव्हॉल्व्हर पळवले

Published On: Jan 21 2018 2:52AM | Last Updated: Jan 21 2018 12:46AMपुणे : प्रतिनिधी 

पुण्यात फ्लॅट पाहण्यासाठी आलेल्या परळी वैजनाथ येथील एका डॉक्टरच्या बॅगेतून पुणे स्टेशन येथील एका हॉटेलमधून अज्ञातांनी चक्क रिव्हॉल्व्हर, सात काडतुसे  आणि मोबाईल चोरल्याचा प्रकार शनिवारी सकाळी उघडकीस आला. पुणे रेल्वे स्थानकासमोरील नॅशनल  हॉटेलमध्ये हा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी डॉ. रविंद्र गायकवाड (परळी वैजनाथ) यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.त्यानुसार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी डॉ. रविंद्र गायकवाड हे परळी वैजनाथ येथील राहणारे आहेत. त्यांचे परळी येथे ऑर्थोपेडीक रुग्णालय आहे. दरम्यान त्यांच्याकडे एक परवाना असलेले रिव्हॉल्व्हर आहे. ते चार दिवसांपूर्वी पुण्यात फ्लॅट पाहण्यासाठी आले होते. त्यांना मधुमेहाचा त्रास असल्याने त्यांच्यासोबत नेहमी एक व्यक्ती असते. ते त्या व्यक्तीला घेऊन पुण्यात आले. त्यावेळी ते पुणे स्टेशन परिसरातील नॅशनल हॉटेलमध्ये थांबले. ते दिवसभर फ्लॅट पाहून परत लॉजमधील खोलीत थांबत असत.

दरम्यान शुक्रवारी रात्री ते अकराच्या सुमारास लॉजमध्ये आले. ते आणि त्यांचे सहकारी झोपले. मात्र ते खोलीचा दरवाजा बंद करण्यास विसरले. ते आज परळी वैजनाथ येथे परत जाणार होते. दरम्यान ते सकाळी उठले. त्यानंतर त्यांनी सकाळी नऊच्या सुमारास त्यांची बॅग पाहिली. त्यावेळी बॅगमधून रिव्हॉल्व्हर, सात काडतुसे आणि त्यांचा मोबाईल गायब असल्याचे लक्षात आले. त्यांनी तत्काळ बंडगार्डन पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी लॉजमध्ये येऊन पाहणी केली आणि त्यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल केला. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक हनिफ मुजावर करीत आहेत.