Mon, May 20, 2019 22:58होमपेज › Pune › ‘सेल्फी’ची हौस बेततेय पर्यटकांच्या जीवावर

‘सेल्फी’ची हौस बेततेय पर्यटकांच्या जीवावर

Published On: Jun 19 2018 1:27AM | Last Updated: Jun 19 2018 12:16AMलोणावळा : विशाल पाडाळे

लोणावळा शहर पावसाळा सुरू झाला की पर्यटकांच्या गर्दीने फुलू लागते. येथील उंच डोंगरावरून खाली कोसळणारे धबधबे, धुक्यात हरवलेल्या वाटा, हवेतील गारवा, कोसळणार्‍या पावसाच्या सरी असे फुलून आलेले निसर्ग सौंदर्य बघण्यासाठी पावसाळ्याच्या काळात लोणावळ्यात लाखोंच्या संख्येने पर्यटक हजेरी लावत असतात. त्यातही शनिवार- रविवारचा ‘वीक-एण्ड’ला जोडून आलेल्या सुट्ट्यांमध्ये पर्यटकांची संख्या वाढते.

लोणावळ्यातील अमृतांजन पॉईंट, राजमाची पॉईंट, लायन्स पॉईंट,  टायगर पॉईंट, शूटिंग पॉईंट,  गिधाड तलाव, लोणावळा धरण, तुंगार्ली धरण या पॉईंट सोबतच लोणावळ्याच्या जवळच असलेला राजमाची किल्ला, लोहगड किल्ला, कार्ला आणि भाजे लेणी हे बघण्यासाठी पर्यटक गर्दी करतात. पावसाळ्यात ‘ओव्हर फ्लो’ झालेले भुशी धरण म्हणजे पर्यटकांची पंढरीच. या धरणाच्या पायर्‍या वरून फेसाळत वाहणार्‍या पाण्यात डुंबण्याचा आनंद लुटण्यासाठी तरुण-तरुणी पासून अबाल वृद्धांपर्यंत हजारो लोक एकाच वेळी मोठी गर्दी करीत असतात. 

अनेकदा पर्यटकांच्या अतिउत्साहीपणामुळे जेव्हा यातील एखाद्या पर्यटन स्थळांवर दुर्घटना घडते, तेव्हा मात्र येथील पर्यटनावर आणि पर्यटकांच्या सुरक्षिततेवर प्रश्‍न उपस्थित केले जातात. ’कुछ तुफानी करते है’ या नादात माहिती नसणार्‍या ठिकाणी पाण्यात उतरण्याचे, पोहण्याचे दुस्साहास करणे, डोंगरकड्याच्या टोकावर किंवा अवघड जागी जाऊन सेल्फी काढण्याचा प्रयत्न करणे, चालू गाड्यांच्या खिडकीत किंवा टपावर बसून मद्यप्राशान करून आरडाओरडा करणे. सार्वजनिक ठिकाणी बंदी असतानाही खुलेआम हुक्का ओढणे, दारू पिणे यासारख्या नाशापान करणे आदी गोष्टी अपघातास कारणीभूत ठरतात. यात बहुतांशी पर्यटकांचा अतिउत्साहीपणाच कारणीभूत असतो;  मात्र हे सर्व अनेकदा समोर घडत असताना, किंवा हे असे अमुक एका ठिकाणी घडते असे माहीत असतानाही त्याकडे कानाडोळा किंवा दुर्लक्ष करणारे पोलिस आणि वन खातेही खातेही तेवढेच जबाबदार आहेत.

लायन्स पॉईंट आणि टायगर पॉईंट याठिकाणी सर्रासपणे अनेक तरुण  पर्यटक हुक्का ओढताना किंवा चारचाकीतील टेप जोरजोरात वाजवीत नाचगाणे करीत मद्यप्राशन करताना नजरेस पडतात. या हुल्लडबाजांमुळे इतर पर्यटकांना नाहक त्रासास सामोरे जावे लागते; तसेच हे अतिउत्साही पर्यटक जीव धोक्यात घालून विविध पॉईंटवर सेल्फीची हौस भागविताना मृत्यूस आमंत्रण देतात. 

यंदाचा पावसाळी पर्यटनाचा हंगाम सुरू झाला असून, किमान यापुढील काळात येथे येणार्‍या पर्यटकांनी अतिउत्साही; तसेच आपला जीव धोक्यात घालणारे पर्यटन टाळून निखळ पर्यटनाचा आनंद घ्यावा, तसेच सरकारी यंत्रणांनीही आपली कर्तव्ये पार पाडावीत. त्यामुळे निश्‍चितच लोणावळ्यातील पर्यटन स्वत:ला तसेच इतरांनाही सुरक्षित, सुखावह आणि आनंद देणारे ठरेल.