Fri, Apr 26, 2019 01:25होमपेज › Pune › संभाजी महाराज समाधिस्थळावर पर्यटकांची गर्दी

संभाजी महाराज समाधिस्थळावर पर्यटकांची गर्दी

Published On: May 16 2018 1:39AM | Last Updated: May 16 2018 1:39AMकोरेगाव भीमा : प्रतिनिधी

सुट्यांचा हंगाम सुरू असल्याने तुळापूर ग्रामपंचायतीने केलेल्या विविध विकासामुळे श्रीक्षेत्र तुळापूर येथील संभाजी महाराज समाधी स्थळावर दिवसेंदिवस पर्यटकांची गर्दी वाढत आहे. यामुळे येथील लहान-मोठ्या व्यावसायिकांना सुगीचे दिवस आले आहेत.

मागील काही दिवसांमध्ये हवेली तालुक्यातील श्रीक्षेत्र तुळापूर येथील समाधीस्थळाचा विविध माध्यमातून मिळणार्‍या निधीच्या बळावर विकास होत आहे. यामध्ये समाधीस्थळाच्या विकासाबरोबरच स्वच्छतेलादेखील महत्व देण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यापाठोपाठ संपूर्ण महाराष्ट्रातुन पर्यटक याठिकाणी नतमस्तक होण्यासाठी तसेच भीमा-भामा-इंद्रायणी या तीन नद्यांच्या त्रिवेणी संगमाचे विलोभनीय दृश्य मोबाईल आणि कॅमेर्‍यात कैद करण्यासाठी गर्दी करीत आहेत. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद व जिल्हा परिषदेच्या विद्यमान सदस्या कल्पना सुभाष जगताप यांच्या माध्यमातून श्रीक्षेत्र तुळापूर येथील संभाजी महाराज समाधीस्थळ, वाडेबोल्हाई येथील बोल्हाई माता मंदिर तर सांगवी सांडस येथील विष्णू मंदिर व परिसराचा झपाट्याने  विकास होत आहे. याचाच परिणाम म्हणून या ठिकाणी पर्यटक गर्दी करत आहेत. तुळापूर येथील समाधीस्थळावरील विकासकामांमध्ये त्रिवेणी घाटापर्यंतचा रस्ता, पेव्हिंग ब्लॉक, समाधी स्थळाला संगमरवर फरशी तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यातच ऐन उन्हाळ्यात या तीनही नद्यांना पाणी असल्याने संपूर्ण परिसरात उत्साही वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान दि. 1 जानेवारी रोजी कोरेगाव भीमा तसेच वढू बुद्रुक येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर तुळापूर या ठिकाणी 24 तास पोलीस कर्मचारी पहारा देत असतात. या ठिकाणी असलेली हिरवळ जपण्यासाठी अनेक स्वयंसेवक काम करत असतात. तसेच दुरून येणार्‍या शंभु भक्तांसाठी भक्त निवासाची मोफत सोय करण्यात आली असल्याचे सरपंच गणेश पुजारी यांनी सांगितले. याच बरोबर येत्या काही दिवसात संभाजी महाराज यांच्या पुतळ्याभोवती असणार्‍या तटबंदीचे राहिलेले कामदेखील पूर्ण करण्यात येणार आहे. याकरिता नागरिकांनीदेखील सहकार्य करणे गरजेचे असून आपली सुरक्षितता आणि स्वच्छता ही आपणच जपावी, असे आवाहन हवेलीचे माजी पंचायत समिती सदस्य सुभाष आप्पा जगताप यांनी केले आहे.