Tue, Aug 20, 2019 15:10होमपेज › Pune › बँक बुडण्याच्या अफवेने पैसे काढण्यासाठी खातेदारांची गर्दी !

बँक बुडण्याच्या अफवेने पैसे काढण्यासाठी खातेदारांची गर्दी !

Published On: Apr 19 2019 1:52AM | Last Updated: Apr 19 2019 1:52AM
पुणे : प्रतिनिधी

सांगोवांगी पोहोचलेले निरोप व समाजमाध्यमांतून उठलेल्या अफवेचा आधीच चौकशीच्या गर्तेत अडकलेल्या शिवाजीराव भोसले सहकारी बँकेला गुरुवारी (दि. 18) फटका बसला. बँकेच्या शिवाजीनगर शाखेत सकाळपासूनच पैसे काढण्यासाठी खातेदारांची गर्दी होती. सायंकाळी उशिरापर्यंत ग्राहकांची झुंबड कायम होती. मागणी केलेल्या रकमेपेक्षा निम्मीच रक्कम हातात टेकविली गेल्याची तक्रार खातेदारांनी केली. उर्वरित रक्कम मंगळवारी दिली जाणार असल्याचे बँकेतर्फे सांगण्यात आल्याचाही दावा या खातेदारांनी केला. मंगळवारपर्यंत बँकेचे सर्व ‘व्यवहार‘ सुरळीत होतील, असे अधिकारी, कर्मचारी वर्गाने पटवून देऊनही ग्राहक ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. 

सहकार विभागाने बँकेचे लेखापरिक्षण केले होते. त्यातून गैरव्यवहार उघड झाल्यानंतर लेखापरिक्षक चांगदेव पिंगळे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार, बेकायदेशीर कर्ज मंजूर करुन फसवणूक केल्याप्रकरणी 20 मार्च 2019 रोजी गुन्हा दाखल झाला. तेव्हापासून बँकेच्या अर्थिक स्थितीबाबत अफवा उठत आहेत. शिवाजीनगर शाखेशी संबंधित या गैरव्यवहारात बँकेचे शाखाधिकारी मिलिंद टण्णू, तत्कालीन कज र्अधीक्षक वसंत भुवड, हणमंत केमधरे, हरबन्ससिंग जब्बल व अन्य पदाधिकारी यांना अर्थिक गुन्हे शाखेने अटक केल्यानंतर शिवाजीराव भोसले सहकारी बँकेचे सर्वसामान्य खातेदार, ठेवीदार धास्तावले आहेत. आयुष्याची जमापुंजी मातीमोल होऊ नये यासाठी खातेदार आता रोज खात्यातील रक्कम काढण्यासाठी रांग लावत आहेत. बँकेकडून खातेदारांना मागणीनुसार, पूर्ण रक्कम मिळत नसल्याने बँकेच्या अर्थिक स्थितीबाबत अफवांत अधिकच भर पडत आहे.