Tue, Apr 23, 2019 22:16होमपेज › Pune › निधी वर्गीकरण विषय मागे घेण्याच्या हालचाली

निधी वर्गीकरण विषय मागे घेण्याच्या हालचाली

Published On: Jun 27 2018 1:57AM | Last Updated: Jun 27 2018 1:18AMपिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सन 2018-19च्या अर्थसंकल्पातील सुमारे 264 कोटी रुपयांचा अखर्चित निधी वर्गीकरणाच्या विषयावरून सर्वसाधारण सभेत सत्ताधारी भाजपमध्ये वाद निर्माण झाला आहे. सदर वर्गीकरणाचे विषय मागे घेण्याच्या पालिका प्रशासनाच्या हालचाली आहेत. त्यामुळे बुधवारी (दि.27) होणारी तहकूब सभा केवळ निमित्तमात्र ठरण्याची शक्यता आहे. 

स्थायी समितीने मंगळवारी (दि.19) झालेल्या सभेत अर्थसंकल्पातील विविध कामाच्या तरतुदीमध्ये बदल करून, सुमारे 264 कोटींच्या अखर्चित निधी तरतूद वर्गीकरणास आयत्यावेळी मान्यता देण्यात आली. तशी शिफारस सर्वसाधारण सभेकडे करण्यात आली. हा प्रस्ताव आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मांडला होता. हे विषय बुधवारी (दि.20) सर्वसाधारण सभेत ‘वन-के’खाली ऐनवेळी दाखल करून घेण्यात आले. त्यावर शुक्रवारी (दि.22) झालेल्या तहकुब सभेत मोठा वाद निर्माण झाला होता. 

सुमारे 100 कोटींची तरतूद इंद्रायणीनगर परिसरात रस्ते काँक्रीटीकरणासाठी वर्ग करण्यात आली आहे. त्यामुळे भाजपच्या नगरसेविका सीमा सावळे यांनी या वर्गीकरणास विरोध दर्शविला. सदर तरतूद ‘शून्य’ करण्याचा हट्ट त्यांनी आयुक्त हर्डीकर यांच्याकडे धरला. या संदर्भात आयुक्त व शहर अभियंता अंबादास चव्हाण यांनी खुलासा करूनही त्यांचे समाधान झाले नाही. त्यावर भाजपचे विलास मडिगेरी यांनी सदर काम आवश्यक असल्याचे सांगत ते प्राधिकरणाकडून करून घेतले जाणार असल्याचे स्पष्ट केले. 

त्यावरून सभागृहात गोंधळ झाल्याने महापौर नितीन काळजे यांनी सभा 10 मिनिटासाठी तहकूब केली. त्यानंतर सभा बुधवार (दि.27) दुपारी तीनपर्यंत तहकूब करण्यात आली. उद्याच्या सभेत वर्गीकरणाच्या विविध 5 विषयावर पुन्हा वादळी चर्चा होण्याची शक्यता होती. मात्र, पालिका प्रशासन सदर विषय फेरपडताळणी करण्यासाठी मागे घेत असल्याचे सूत्रांनी सांगितले. फेरपडताळणीमध्ये त्या-त्या प्रभागातील चारही नगरसेवकांची बैठक घेऊन सर्वसहमतीने निर्णय घेण्यात येणार आहे. त्यानंतर पुन्हा हा विषय मंजुरीसाठी सर्वसाधारण सभेपुढे आणला जाण्याची शक्यता आहे.