Mon, Apr 22, 2019 11:53होमपेज › Pune › ‘ए प्लस’ महाविद्यालये अनुदानापासून वंचित

‘ए प्लस’ महाविद्यालये अनुदानापासून वंचित

Published On: Jul 01 2018 2:15AM | Last Updated: Jul 01 2018 1:01AMपुणे : प्रतिनिधी 

राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानांतर्गत महाविद्यालयांना प्रत्येकी दोन कोटी रुपयांचे अनुदान मिळण्यासाठी ऑनलाइन अर्ज करणार्‍या महाविद्यालयांचे राष्ट्रीय मूल्यांकन व अधिस्वीकृती परिषदेचे (नॅक) मूल्यांकन 3.5 पेक्षा अधिक असल्याने त्यांना अर्जच करता येत नसल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे राज्यात ए प्लस श्रेणी असणारे 26 महाविद्यालये अनुदानापासून वंचित राहणार आहे. दरम्यान, मूल्यांकन 3.5 पेक्षा कमी असलेल्या महाविद्यालयांना अर्ज करता येत असल्याने इतर महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

रुसाच्या नियमामुसार नॅकच्या मूल्यांकनामध्ये ज्या महाविद्यालयांना 2.5 किंवा त्यापेक्षा अधिक गुणांकन प्राप्त झाले आहे, अशा महाविद्यालयांना विविध शैक्षणिक सुधारणांसाठी आणि विकासकामांसाठी आर्थिक अनुदान देण्यात येते. या अनुदानासंदर्भातील पुढील फेरीची कार्यवाही सुरू झाल्याने पात्र महाविद्यालयांना येत्या सोमवारपर्यत अर्ज करायचा आहे. त्यानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नित असणार्‍या महाविद्यालयांसोबतच राज्यातील प्रमुख शहरांतील महाविद्यालयांनी अर्ज करण्याचा प्रयत्न केला.

नॅकनुसार 2.5 पेक्षा अधिक तर, 3.5 पेक्षा कमी मूल्यांकन प्राप्त झाले आहे, अशा महाविद्यालयांनी अनुदानासाठी अर्ज केले. मात्र, मूल्यांकन 3.5 पेक्षा अधिक असणार्‍या राज्यातील एकूण 26 महाविद्यालयांना अर्ज भरता येत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कमी मूल्यांकन असलेल्या महाविद्यालयांना अनुदान तर, जादा मूल्यांकन असलेल्या महाविद्यालयांना अर्जच करता येत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. रुसाच्या पोर्टलमधून अर्ज करण्याची अंतिम मुदत सोमवारपर्यत आहे. त्यामुळे या प्रकरणात रुसाच्या प्रशासनाने त्वरित निर्णय न घेतल्यास राज्यातील 26 महाविद्यालये आर्थिक अनुदानापासून वंचित राहणार आहे. अनुदान न मिळाल्याने महाविद्यालयांमध्ये शैक्षणिक सुविधा निर्माण होण्यास अडचणी निर्माण होतील. या कारणाने स्वायत्तता मिळविण्यासाठी महाविद्यालयांना  अडचण होईल, अशी शंका प्राचार्यांनी उपस्थित केली आहे.

मॉडर्न कॉलेज ऑफ आर्टस्, सायन्स अ‍ॅन्ड सायन्स महाविद्यालयाला नॅकच्या मूल्यांकनात 3.51 गुणांकन प्राप्त झाले असून  ए प्लस श्रेणी आहे. रुसाने जाहीर केलेल्या नियमावलीनुसार असे लक्षात येते की तुम्ही अगोदर स्वायत्तता घ्या मग आम्ही अनुदान देऊ; मात्र सध्या मिळत असलेले अनुदान जर आमच्या महाविद्यालयाला मिळाले तर स्वायत्ततेकडे जात असताना आणखी चांगल्या सुविधा निर्माण करता येणार आहे.- डॉ. राजेंद्र झुंजारराव, प्राचार्य, मॉडर्न कॉलेज ऑफ आर्टस्, सायन्स अ‍ॅन्ड सायन्स