Mon, May 27, 2019 01:34होमपेज › Pune › ‘अन्नसुरक्षा’चे 99 लाख नवे लाभार्थी : बापट

‘अन्नसुरक्षा’चे 99 लाख नवे लाभार्थी : बापट

Published On: May 23 2018 1:25AM | Last Updated: May 22 2018 11:58PMपुणे : प्रतिनिधी

ग्रामीण आणि शहरी भागातील कुटुंबांच्या कमाल वार्षिक उत्पन्नाच्या मर्यादेनुसार, 30 एप्रिल 2018 पर्यंत आधार सिडींग होऊन, पात्र ठरविण्यात आलेल्या सर्व लाभार्थ्यांचा राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेमध्ये समावेश करण्यात येणार आहे. त्यामुळे नवीन 99 लाख लाभार्थ्यांना अन्नसुरक्षा योजनेचा लाभ मिळणार आहे, अशी माहिती माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी दिली.

राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम 2013 नुसार 1 फेब्रुवारी 2014 पासून अन्नसुरक्षा योजनेची अंमलबजावणी  करण्यात येत आहे. राज्य शासनाकडून 2011 च्या जनगणनेनुसार ग्रामीण भागासाठी ग्रामीण लोकसंख्येच्या 76.32 टक्के  म्हणजेच 4 कोटी 70 लाख, तर शहरी लोकसंख्येच्या 45.34 टक्के, म्हणजेच 2 कोटी 30 लाख कुटुंबांना स्वस्त धान्य दिले जात आहे. मात्र, यात आता नवीन लाभार्थ्यांची निवड केली जाणार आहे. त्यात 30 सप्टेंबर 2016 ऐवजी 30 एप्रिल 2018 पर्यंतच्या पात्र शिधापत्रिकांचा विचार केला जाणार आहे, असेही बापट म्हणाले.

वार्षिक उत्पन्न 44  हजारांपेक्षा कमी असलेल्या  56 लाख 63 हजार 282 आणि  59  हजारांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या 36 लाख 73 हजार 32 शिधापत्रिकाधारकांना, तसेच अंत्योदय अन्न योजनेतील 1 व 2 सदस्य असलेल्या शिधापत्रिका, अशा सुमारे 99 लाख शिधापत्रिकांचा नव्याने राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेत समावेश करण्यात येणार आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना सुरू करण्यापूर्वी राज्यात 8 कोटी 77 लाख 34 हजार 849 एवढे लाभार्थी होते. राज्यातील आधार सिडींगचे काम पूर्ण झाल्यानंतर वाचलेल्या अन्नधान्याचे वाटप राज्यातील नवीन 99 लाख गरजूंनाही केले जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.