Sat, Jul 11, 2020 11:17होमपेज › Pune › देशात सरासरीच्या ९६ ते १०४% पाऊस

देशात सरासरीच्या ९६ ते १०४% पाऊस

Last Updated: Jun 02 2020 1:33AM
पुणे : पुढारी वृत्तसेवा

देशात यंदा मान्सूनचा जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरीच्या 96 ते 104 टक्के (कमी-जास्त 4 टक्के) एवढा पाऊस पडेल, तर देशाच्या विभागवार 107 टक्के पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने सोमवारी वर्तविला आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाने 16 एप्रिल रोजी पहिला अंदाज वर्तविला होता. त्या अंदाजात सरासरी  96 ते 104 टक्के इतका पाऊस पडेल, असे सांगण्यात आले होते. सोमवारी (दि. 1) जाहीर केलेल्या मान्सूनच्या दुसर्‍या अंदाजामध्येदेखील सरासरीएवढाच पाऊस पडेल, असे जाहीर करण्यात आले आहे. परिणामी, वर्तविण्यात आलेला दुसरा अंदाज पहिल्या अंदाजाएवढाच आहे, असे दिसून आले आहे.

दरम्यान, देशातील ईशान्य भारतातील राज्यांमध्ये 100 टक्के, मध्य भारतात 102 टक्के, दक्षिण भारतात 96 टक्के, मॉडेल एररनुसार कमी-जास्त 8 टक्के फरक पडण्याची शक्यता आहे, असेही सांगण्यात आले आहे.

राज्यात यावर्षी सरासरीच्या 98 टक्के (कमी-जास्त 5 टक्के)  पाऊस पडेल, असा अंदाज महाराष्ट्र शासनाचे माजी हवामान सल्लागार आणि पुण्यातील ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी व्यक्‍त केला आहे. जूनअखेर ते जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसामध्ये खंड पडणार आहे. ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये मात्र गेल्यावर्षीप्रमाणेच अतिवृष्टी होईल, अशी शक्यता आहे.

जून, जुलैमध्ये कोल्हापूरसह राहुरीमध्ये मोठा खंड पडणार

जून, जुलै महिन्यात राहुरी, कोल्हापूर, अकोला, पाडेगाव येथे पावसाचा मोठा खंड राहण्याची शक्यता आहे. दापोली, सोलापूर, पुणे, धुळे, निफाड, जळगाव, चंद्रपूर व परभणी या भागात चांगला पाऊस राहणार आहे.

केरळात मान्सूनची हजेरी

केरळ व किनारपट्टीवर मान्सूनने जोरदार हजेरी लावली असून पुढील दोन-तीन दिवसांत कर्नाटक, गोवामार्गे तळ कोकणापर्यंत धडक मारण्याची शक्यता आहे.  केरळात मान्सून  वार्‍यांचा वेग ताशी 65 ते 85 कि.मी. आहे. हे वारे गुजरातकडे सरकताना त्याचा वेग 90 ते 100 कि.मी. वेगाने होऊन त्याचे चक्रीवादळात रूपांतर होईल. गुजरात किनारपट्टीवर हे चक्रीवादळ 3 जूनला धडकणार आहे.