होमपेज › Pune › अवघ्या 4 महिन्यांत उजनीचे 96 टक्के पाणी संपले 

अवघ्या 4 महिन्यांत उजनीचे 96 टक्के पाणी संपले 

Published On: May 23 2018 1:45AM | Last Updated: May 23 2018 1:33AMभिगवण : प्रतिनिधी

जानेवारीमध्ये तब्बल 99 टक्के असणारा उजनी धरणातील पाणीसाठा मे महिन्याच्या अखेरीस अवघा 2.30 टक्क्यावरआला असून उपयुक्त साठा 1.23 वर येऊन ठेपला आहे. अवघ्या चार महिन्यांत 96 टक्के पाणी वापरले गेल्याने धरणग्रस्तांना दुष्काळ, तर सोलापूरकरांना मात्र सुकाळ, अशी परिस्थिती यंदाही धरणग्रस्तांच्या वाट्याला आली आहे. त्यामुळे उजनीचे एवढे पाणी मुरते तरी कुठे, असा प्रश्‍न धरणग्रस्तांना पडला आहे.

जानेवारीत उजनीचा 99 टक्के इतका पाणीसाठा लक्षात घेता यंदा उन्हाळ्यात पाण्याची कमतरता भासणार नसल्याचा धरणग्रस्तांना विश्‍वास होता. मात्र सध्याची खालावलेली पाणी परिस्थिती पाहता इंदापूर, दौंड, कर्जत, करमाळा या तालुक्यांतील शेतकरी व पिण्याच्या पाण्याच्या योजनांच्या गावांचा घसा कोरडा पडला आहे. गेल्या वर्षी याच दिवशी म्हणजे दि.22 मे 2017 रोजी उजनीचा पाणीसाठा उणे 27.38 टक्के इतका होता. त्यामानाने यंदा हा साठा 34.89 टीएमसी असला तरी येत्या काही दिवसांतच उजनीच्या पाण्याची वाटचाल ही अचल साठ्याकडे येऊन ठेपली आहे. त्यातही बोगद्यातून 710 कालव्याद्वारे 3350 व सीना-माढा बोगद्यातून 240 क्युसेकने सध्या विसर्ग सुरू आहे. साहजिकच धरणग्रस्तांच्या तोंडाचे पाणी पळाले आहे. पाणलोट क्षेत्र झपाट्याने खाली होऊ लागले असल्याने शेतकर्‍यांची त्रेधातिरपीट सुरू झाली आहे.

एका बाजूने सूर्य आग ओकत असल्याने बळीराजाची शेती अक्षरश: करपू लागली आहे. यंदा शंभर टक्के धरण भरल्याने गेल्या चार-पाच वर्षातील दुष्काळाची कसर यंदा भरून निघण्याची अशा निर्माण झाली होती. मात्र एवढे पाणी असूनही चार महिन्यात उजनीच्या पाण्याला सोलापूरकडे पाझर फुटल्याने पाणलोट क्षेत्र रिते पडू लागले आहे. त्यामुळे इंदापूर, दौंड, कर्जत व करमाळा भागातील बहुतांश भागात पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे.उजनीच्या पाण्याला फुटत असलेले पाय लक्षात घेता उजनीच्या पाण्यावर धरणग्रस्तांपेक्षा सोलापूरचाच अधिकार वरचढ असल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे.

अजून पाणी सुटणार?

एवढा पाणीसाठा खालवला असला तरी येत्या 27 मे पासून पुन्हा उजनीचे पाणी सोलापूरला सुटणार असल्याची चर्चा आहे. याबाबत जलसंपदा विभागाशी संपर्क साधला असता, पाणी सोडण्याची मागणी होत आहे. मात्र अद्यापपर्यंत तसे आदेश नसल्याचे सांगण्यात आले.एकंदरीत अधिक मासानिमित्त पंढरपूरसाठी पाणी सोडले तरी अधिक मास हे कारण ठरू शकते. सोलापूरकरांचा उजनीच्या पाण्यावरचा दबदबा पाहता अधिक मासाचे  निमित्त करून सोलापूर, सांगोला, मंगळवेढा या भागातील बंधारे भरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे इंदापूर, दौंड, कर्जत व करमाळा भागातील पाण्याचा प्रश्‍न अधिक गंभीर होण्याची चिन्हे आहेत.