होमपेज › Pune › ‘पीएमपी’च्या 96 चालकांना भोवला ‘टॉकटाइम’ 

‘पीएमपी’च्या 96 चालकांना भोवला ‘टॉकटाइम’ 

Published On: Jun 22 2018 2:05AM | Last Updated: Jun 22 2018 12:19AMपुणे : प्रतिनिधी

बस चालविताना मोबाइलवर बोलणार्‍या 96 चालकांवर पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएल) प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. संबंधित चालकांकडून प्रत्येकी एक हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. दरम्यान, बस चालविताना मोबाइलवर बोलणार्‍या विरोधात पीएमपीएमएल प्रशासनाने कारवाईचा वेग वाढविला आहे.वाहन चालविताना मोबाइलवर बोलणे धोकादायक आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण होऊ शकते. त्या पार्श्‍वभूमीवर बस चालविताना चालक मोबाइलवर बोलताना आढळल्यास प्रवाशांनी त्यांचे फोटो काढून महामंडळाकडे जमा करण्याचे आवाहन  पीएमपीएमएल प्रशासनाकडून करण्यात आले होते. त्यानुसार संबंधित प्रवाशास एक हजारांचे बक्षीस देण्यात येणार होते. 

जानेवारी 2014 ते फेब्रुवारी 2018 दरम्यानच्या कालखंडात शहरातील विविध रस्त्यांवरून बस चालविणारे 95 बसचालक मोबाइलवर बोलत असल्याचे फोटो पीएमपीएमएल प्रशासनाकडे दाखल करण्यात आले होते. त्यानुसार प्रशासनाने संबंधित चालकाची ड्युटी, बसक्रमांक, फोटो तारीख, तिकीट अनुक्रमांक, वाहकाचा क्रमांक इत्यादीची तपासणी करून चालकांकडून प्रत्येकी एक हजाराचा दंड वसूल केला आहे. दंडाची रक्कम फोटो काढणार्‍या प्रवाशाला बक्षीस म्हणून देण्यात आली आहे. बस चालविताना मोबाइलवर बोलल्यास मार्च 2018 पासून दंडाची रक्कम वाढवून दोन हजार रुपये करण्यात आली होती. त्यानुसार मार्चमध्ये एका चालकावर दंडात्मक कारवाई करण्यातआली आहे.