Mon, Apr 22, 2019 04:24होमपेज › Pune › महापालिकेने बुजविले 900 खड्डे

महापालिकेने बुजविले 900 खड्डे

Published On: Jul 21 2018 1:32AM | Last Updated: Jul 21 2018 1:09AMपुणे : प्रतिनिधी

पावसाने उघडीप दिल्याने महापालिकेने खड्डे बुजविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे. शहरात आतापर्यंत जवळपास 900 खड्डे बुजविण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या पथ विभागाकडून देण्यात आली, तर पालिकेच्या टोल फ्री क्रमांकावर शुक्रवारपर्यंत 129 इतक्या खड्ड्यांच्या तक्रारींची नोंद झाली. पावसामुळे शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. गुरुवारी झालेल्या मुख्यसभेतही त्याचे पडसाद उमटले. त्यानंतर आता प्रशासनाने खड्डे बुजविण्यासाठी वेगाने कामे सुरू केली असल्याची माहिती पथ विभागाचे अधीक्षक अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी दिली. ते म्हणाले, 15 क्षेत्रीय कार्यालयांकडे असलेल्या रस्ते दुरुस्ती व्हॅनमार्फत खड्डे बुजविण्याची कार्यवाही सुरू आहे, आतापर्यंत जवळपास 900 खड्डे बुजविले गेले आहेत. त्यावर जवळपास 30 लाखांचा खर्च झाला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. खड्ड्यांच्या तक्रारींसाठी महापालिकेने सुरू केलेल्या टोल फ्री क्रमाकांवर गेल्या तीन दिवसांत 129 तक्रारींची नोंद झाली असून, त्यात शुक्रवारी आलेल्या 22 तक्रारींचा समावेश आहे.

मेट्रो आणि एमएसआरडीसीकडून दुर्लक्ष

शहरातील रस्त्यांवर मेट्रोचे काम सुरू आहे, त्या रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची जबाबदारी मेट्रोची आहे. मात्र, मेट्रोला तब्बल सहावेळा पत्रव्यवहार करूनही खड्डे बुजविण्याबाबत काहीच उपाययोजना केलेल्या नाही. त्याचबरोबर स्वारगेट येथील जेधे चौकातील उड्डाणपूल रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) केला आहे. त्यामुळे याठिकाणच्या खड्ड्यांची जबाबदारी एमएसआरडीसीची आहे. मात्र, एमएसआरडीसीकडून उपाययोजना होत नाही. त्यामुळे पालिकेची नाहक बदनामी होते. मात्र, नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी याठिकाणचे खड्डे बुजविण्याचे काम करण्यात येत असल्याचे पावसकर यांनी स्पष्ट केले.

सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

कर्वे रस्त्यावरील करिष्मा सोसायटीच्या चौकातील खड्ड्यामुळे झालेल्या अपघातात भद्रेश्वर मनमय स्वामी ह्या 29 वर्षीय तरुणाचा बळी गेला, तर अन्य तीन अपघातात काही वाहनचालक जखमी झाले. त्यामुळे यापुढे कोणत्याही भागात खड्ड्यामुळे अपघातात एखाद्याचा जीव गेला अथवा जखमी झाल्यास त्या भागातील कंत्राटदार अथवा कामात कुचराई करणार्‍या अधिकार्‍यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याबाबत सर्व पोलिस स्टेशनला सूचना द्याव्यात, अशी मागणी क्रिएटिव्ह फाउंडेशनने पालिका व पोलिस आयुक्तांकडे केली आहे.