होमपेज › Pune › ‘टेमघर’च्या बांधकाम खर्चाची वसुली सुरू

‘टेमघर’च्या बांधकाम खर्चाची वसुली सुरू

Published On: Jul 20 2018 1:12AM | Last Updated: Jul 20 2018 12:36AMपुणे : प्रतिनिधी 

टेमघर धरणाचे बांधकाम गुणवत्तापूर्ण झाले नाही. त्यामुळेच गळती लागली आहे. ही बाब लक्षात घेऊन धरणाचे बांधकाम केलेल्या ठेकेदाराकडून झालेल्या खर्चाची वसुली करण्याचे काम शासनाने सुरू केले आहे. आतापर्यंत ठेकेदाराने सिक्युरिटी डिपॉजिट ठेवलेले पाच कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. काही प्रकरणे न्यायालयात प्रलंबित असून धरणासाठी खर्च होणारी रक्कम संबधित ठेकेदाराकडून वसूल करण्यात येणार असल्याचे माहिती अधीक्षक अभियंता प्रवीण कोल्हे यांनी दिली.

टेमघर धरणाचे काम सन 2010 मध्ये पूर्ण झाले. मात्र त्यानंतर धरणातून पाणी गळती सुरू झाली. या धरणाचे काम करणार्‍या ठेकेदाराने गुणवत्तापूर्ण काम केले नसल्याची बाब उघडकीस आहे. तसेच या धरणाचे काम सुरू असतानाच्या काळात जे 32 अधिकारी कार्यरत होते. त्यांच्यावर कामातील बेजबाबदारपणामुळे  फौजदारी गुन्हे दाखल होऊन कारवाई करण्यात आली होती. धरण बांधण्यासाठी सुमारे 60 कोटी रुपये खर्च आलेला आहे. मात्र धरणाला लागलेल्या गळतीमुळे शासनाने संबंधित ठेकेदारावर कारवाई केली आहे, असेही कोल्हे म्हणाले.

धरण दुरुस्तीचे 90 टक्के काम पूर्ण

गळतीमुळे गेल्या दोन वर्षांपासून पाणीसाठ्यासाठी बंद करण्यात आलेल्या टेमघर धरणाच्या पहिल्या टप्प्याच्या दुरुस्तीचे सुमारे 90  टक्के काम पूर्ण झाले आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता प्रवीण कोल्हे यांनी गुरुवारी दिली. दरम्यान उरलेल्या दोन्ही टप्प्यांचे काम पावसाळ्यानंतर हाती घेण्यात येणार आहे.  टेमघर धरणाच्या दुरुस्तीच्या कामाचा पाहणी दौर्‍यानंतर  पत्रकार परिषदेत अधीक्षक अभियंता कोल्हे यांंनी ही माहिती दिली. यावेळी धरणाचे कार्यकारी अभियंता प्रदिक्षणे, शाखा अभियंता सुधीर अत्रे आदी उपस्थित होते.

टेमघर धरणास गळती लागली असल्याची बाब सन 2016 साली जलसंपदा विभागातील अधिकार्‍यांच्या लक्षात आणून देण्यात आली. त्यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी तातडीने या धरणाचा दौरा करून धरणाच्या दुरुस्ती कामासाठी आदेश दिले.  कोल्हे म्हणाले, धरणाच्या ज्या भागात गळती होत आहे. त्या भागात राऊटिंग करण्याचे काम सुरू केले आहे. गळती रोखण्याचे 90 टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम पावसाळा संपल्यानंतर  सुरू करण्यात येणार आहे.

टेमघर पॅटर्न विकसित होणार 

टेमघर धरणाच्या पाण्याची गळती रोखणे हे काम हा पायलट प्रोजेक्ट आहे. या प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर देशातील इतर धरणाच्या दुरुस्तीसाठी हा प्रकल्प मार्गदर्शक ठरणार आहे. त्यामुळे पुढील काळात ‘टेमघर पॅटर्न’ विकसित होणार आहे, असेही अधिकार्‍यांनी सांगितले.