होमपेज › Pune › सूक्ष्म सिंचनासाठी ९ हजार कोटी : केंद्रीय कृषी सहसचिव  बी. किशोर 

सूक्ष्म सिंचनासाठी ९ हजार कोटी : केंद्रीय कृषी सहसचिव  बी. किशोर 

Published On: Jun 01 2018 2:11AM | Last Updated: Jun 01 2018 1:28AMपुणे ः प्रतिनिधी

देशात पंतप्रधान सूक्ष्म सिंचन योजनेंतर्गत चालू आर्थिक वर्ष 2018-19 साठी रुपये 4 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. तसेच सूक्ष्म सिंचन निधीसाठी स्वतंत्रपणे 5 हजार कोटी रुपयांइतका अतिरिक्त निधी केंद्राकडून राज्यांना देण्यात येणार आहे. त्यामध्ये काही कर्जरूपाने तर काही अनुदान रूपाने सूक्ष्म सिंचनासाठी देण्यात येणार आहे. त्याकामी राज्यस्तरीय मंजुरी समितीकडून (एसएलएससी) तत्काळ प्रस्ताव पाठविल्यास सूक्ष्म सिंचन अनुदानाचा निधी वितरित करण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय कृषी सहसचिव बी. किशोर यांनी येथे दिली.

पीएमकेएसवायअंतर्गत केंद्रीय कृषी मंत्रालय आणि राज्याच्या कृषी विभागाच्या पुढाकाराने राष्ट्रीय स्तरावरील एकदिवसीय कार्यशाळा गुरुवारी यशदा येथील सभागृहात झाली. त्यावेळी उद्घाटनाच्या सत्रात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. व्यासपीठावर राज्याचे फलोत्पादन सह संचालक शिरीष जमदाडे, मृद संचालक के. पी. मोते, फलोत्पादन संचालक प्रल्हाद पोकळे, उत्‍तर प्रदेशचे विशेष कृषी सचिव प्रशांत शर्मा, कृषी आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, राजेशकुमार तिवारी आदी उपस्थित होते. कार्यशाळेत 21 राज्यांचे मिळून सुमारे दीडशे कृषी अधिकारी उपस्थित होते. राज्याचे दिवंगत कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांना श्रध्दांजली वाहून कार्यशाळेस सुरुवात झाली.

पंतप्रधान सूक्ष्म सिंचन योजनेत देशात महाराष्ट्राने चांगले काम केल्याची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली येथील आढावा बैठकीत घेतली आणि सर्व राज्यांनी हे काम पाहावे म्हणून ही कार्यशाळा पुण्यात होत असल्याचे सुरुवातीस नमूद करून बी. किशोर पुढे म्हणाले की, महाराष्ट्राने ऑनलाईनद्वारे आधारलिंक बँकिंग करून अनुदान देण्याची यशस्वी पध्दत सूक्ष्म सिंचनात आणली.

त्याचे अनुकरण अन्य राज्यांनी करावे. महाराष्ट्राच्या राज्यस्तरीय मंजुरी समितीकडून सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्याने चालू वर्षातील पहिल्या हप्त्याचा सुमारे 98 कोटी रुपयांचा सूक्ष्म सिंचन अनुदानाचा निधी वितरित करण्यात आला आहे.  उसासाठी सूक्ष्म सिंचन योजना काही धरणांच्या क्षेत्रात राबविण्यासाठी महाराष्ट्राने उचललेले पाऊल स्तुत्य आहे. इतरही राज्यांनी उसासारख्या पाणी खाणार्‍या पिकांसाठी सूक्ष्म सिंचन सक्तीचे करावे.  देशात गतवर्षी  म्हणजे 2017-18 मध्ये ठेवण्यात आलेले 12 लाख हेक्टरचे सूक्ष्म सिंचनाचे उद्दिष्ट साध्य करण्यात आले असून चालूवर्षी 2018-19 मधील 16 लाख हेक्टर क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली आणण्याचे निश्‍चित करण्यात आले. 

कार्यशाळेच्या प्रास्तविकात राज्याचे कृषी आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह यांनी राज्यातील सूक्ष्म सिंचन वाढत असल्याची माहिती दिली.  केंद्राच्या फलोत्पादनातील प्लॅस्टिक कल्चर समितीचे कार्यकारी संचालक आनंद झांबरे यांनी आभार मानले.