होमपेज › Pune › पुणे बंदच्या पार्श्‍वभूमीवर ७ हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात 

पुणे बंदच्या पार्श्‍वभूमीवर ७ हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात 

Published On: Aug 08 2018 8:58PM | Last Updated: Aug 08 2018 8:58PMपुणे प्रतिनिधी 

मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात येणार्‍या आंदोलनाच्या पाश्वभूमीवर शहरात ७ हजार पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आला असून आंदोलकांनी शांततेत आंदोलन करण्याचे आवाहन पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी केले आहे. 

मराठा क्रांती मोर्चाकडून शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी गुरुवारी ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, खडकमाळ येथील प्रांत कार्यालय येथे ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. पिंपरी येथील आंबेडकर चौकात आंदोलन करण्यात येणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर या ठिकाणांवर मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच पोलिस ठाण्यांनाही बंदोबस्त ठेवण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत. असे त्यांनी सांगितले. 

शहरात गुरुवारी एकूण सात हजार पोलिसांचा कडक बंदोबस्त करण्यात आला आहे. यामध्ये चार अतिरिक्त पोलिस आयुक्त, 10 पोलिस उपायुक्त, 15 सहाय्यक पोलिस आयुक्त, 100 पोलिस निरीक्षक, 200 सहाय्यक पोलिस निरीक्षक/उपनिरीक्षक आणि 6 हजार पोलिस  कर्मचारी, एसआरपीएफच्या तीन प्लाटून तैनात असा फोजफाटा तैनात करण्यात आला आहे.  एसआरपीएफच्या तीन प्लाटूनपैकी एक पिंपरी चिंचवड, दुसरी पुण्यात तर तिसरी राखीव ठेवण्यात येणार आहे. त्यासोबतच दंगल नियंत्रण पथकासह  वरूण ही दंगल रोधक वाहने देखील तैनात करण्यात येणार आहेत. यासह पोलीस नियंत्रण कक्षाकडे इतर कर्मचारी व अधिकारी राखीव असणार आहेत. 

आयोजकांनी शांततेत आंदोलन करण्याचे आश्‍वासन दिले आहे.  आंदोलकांनी सहकार्य करावे. तर नागरिकांनी रोजच्या प्रमाणे कामाला जावे, त्यांना अडथळा होणार नाही. तर आंदोलकांनी शांततेत आंदोलन करावे तसेच अफवांवर विश्‍वास ठेवू नये काही निदर्शनास आल्यास पोलिस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून खातरजमा करावी असे आवाहन पोलिस आयुक्त व्यंकटेशम यांनी केले. 

आंदोलनादरम्यान चाकण येथील जाळपोळीची पार्श्‍वभूमी लक्षात घेत पुणे ग्रामीण पोलिसांकडून जिल्ह्यातील नाशिक, सातारा, नगर, सोलापूर यासह मुंबई-पुणे एक्सप्रेस वे या महामार्गांवर अनुचीत प्रकार घडू नयेत यासाठी बंदोबस्त तैनात केला आहे. यामध्ये 2 हजार 200 पोलीस कर्मचारी, 900 होमगार्ड, 3 सीआरपीएफच्या कंपनी, 1 दंगल नियंत्रण पथक,  20 स्ट्रायविंग कंपनी तैनात कऱण्यात आली आहे. तर चाकण येथे शांततेसाठी बैठक घेण्यात आली आहे. असे पोलिस अधिक्षक संदीप पाटील यांनी सांगितले.