Fri, Nov 16, 2018 21:18होमपेज › Pune › ८५ टक्क्यांवरील विद्यार्थ्यांना मिळणार शिष्यवृत्ती

८५ टक्क्यांवरील विद्यार्थ्यांना मिळणार शिष्यवृत्ती

Published On: Jul 22 2018 12:59AM | Last Updated: Jul 22 2018 12:58AMपुणे ः प्रतिनिधी

दहावी किंवा बारावीमध्ये 85 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळालेल्या गरीब विद्यार्थ्यांसाठी शहरातील गणेश मंडळांकडून प्रत्येकी दहा ते वीस हजार रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. त्यासाठी त्यांनी ढोले पाटील रस्ता येथील पुणे सहधर्मादाय आयुक्त  कार्यालयामध्ये गुणपत्रिका आणि एक लाखाच्या आतील उत्पन्नाचा दाखला अशी कागदपत्रे देऊन अर्ज करणे आवश्यक आहे. 

समाजात अनेक गुणवंत विद्यार्थी गरीबीमुळे शिक्षण पुर्ण करू शकत नाहीत, किंवा त्यांना पाहिजे त्या शाखेला प्रवेश घेता येत नाही. अशा विद्यार्थ्यांची गुणवत्‍ता गरीबीमुळे लपून जाते. त्यांची गुणवत्ता समाजापुढे यावी यासाठी धर्मादाय आयुक्‍त शिवकुमार डिगे यांनी राज्यातील गणेश मंडळांना गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत करण्याचे अवाहन केले आहे. त्यासाठी गणेश मंडळांनीही पुढाकार घेतला असून प्रत्येक जिल्ह्यात ही योजना राबविली जात आहे. याबाबत पुणे विभागाचे धर्मादाय उपायुक्‍त नवनाथ जगताप म्हणाले, शहरातील गणेश मंडळांसोबत याबाबत बैठक झाली असता त्यांनी गरीब विद्यार्थ्यांना मदत करण्याची तयारी दर्शवली आहे. 

गरीब विद्यार्थ्यांना आर्थिक मदत मिळावी, यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत आतापर्यंत पाच विद्यार्थ्यांना मदत देण्यात आली आहे. या शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी पात्र विद्यार्थ्यांनी कार्यालयात अर्ज करावेत. - दिलीप देशमुख, सहधर्मादाय आयुक्‍त, पुणे