होमपेज › Pune › ससूनला २४ दात्यांचे ८५ कोटींचे दान!

ससूनला २४ दात्यांचे ८५ कोटींचे दान!

Published On: Mar 19 2018 1:48AM | Last Updated: Mar 19 2018 12:28AMपुणे : प्रतिनिधी

ससून रुग्णालयास गेल्या तीन वर्षांत ‘समाज उत्तरदायित्व निधी’ (सीएसआर फंड) अंतर्गत 24 दात्यांनी 85 कोटी रुपयांची देणगी स्वरू पात विविध वस्तूंचे दान केले आहे. याचा फायदा लाखो गरीब रुग्णांना अधिकाधिक चांगल्या आरोग्य सुविधा देण्यासाठी होत आहे.

सरकारी रुग्णालये म्हटले की, मर्यादित निधीमुळे अपुर्‍या आरोग्य सुविधा ही बाब आलीच. पण यावर मात करता येते हे बीजे वैद्यकीय महाविद्यालय व ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांनी प्रत्यक्षात आणून दाखवले आहे. डॉ. चंदनवाले यांनी केवळ रुग्णालयाच्या सरकारी निधीवर अवलंबून न राहता विविध कंपन्या, सामाजिक संस्था, देवस्थाने, लोकप्रतिनिधी यांच्याकडून जमेल तितकी आर्थिक मदत निधी  ससून रुग्णालयात सुविधा निर्माण करण्यासाठी देण्याचे आवाहन केले होते. त्यासाठी पाठपुरावा केला आणि त्यांच्या प्रयत्नांना यश येत गेले व बघता-बघता तीन वर्षांत तब्बल 85 कोटींच्या निधीतून रुग्णालयात वैद्यकीय उपकरणे व इतर सुविधा त्यांना मिळाल्या. 

यामध्ये मुंबईच्या टाटा ट्रस्टने दोन कोटींचे डीएसए मशिन, बँक ऑफ न्यूयॉर्ककडून दीड कोटींचे अस्थिरोग व डोळ्यांची उपकरणे, रसिकलाल धारिवाल फाउंडेशनकडून तातडीच्या विभागसाठी साडेसहा कोटींचे उपकरणे दान केली आहेत. त्याचप्रमाणे मुकूल माधव फाउंडेशन व दगडूशेठ हलवाई ट्रस्टकडून अकरा कोटींचा नवजात कक्षच उभा केला आहे. अशा प्रकारे अनेक संस्थांंनी कोट्यवधी रुपयांच्या सुविधा दान केल्या आहेत, हे विशेष. ही संकल्पना ‘ससून सीएसआर मॉडेल’ म्हणून राज्यातील इतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांनी राबविण्यास सुरुवात केली आहे.

ससूनमध्ये केवळ गरीबच नव्हे तर, मध्यमवर्गीयांनीही यावे असे स्वप्न आहे. तसेच देणगीदारांना 80 जी अंतर्गत करातूनही सूट मिळते, असे अधिष्ठाता डॉ. चंदनवाले यांनी सांगितले.