Sat, Nov 17, 2018 06:07होमपेज › Pune › जिल्ह्यासाठी 838 कोटींचा निधी

जिल्ह्यासाठी 838 कोटींचा निधी

Published On: Aug 26 2018 1:29AM | Last Updated: Aug 26 2018 12:35AMपुणे : प्रतिनिधी

महाराष्ट्र शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने पुणे जिल्ह्यात मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना आणि शौचालय बांधणी योजना राबविण्यासाठी 838 कोटी 83 लाखांचा निधी मंजूर केला आहे. मुख्यमंत्री पेयजल योजनेद्वारे 59 गावांत 22 योजना राबविण्यासाठी 163 कोटी 64 लाख रुपयांचा निधी खर्च केला जाणार आहे. राष्ट्रीय पेयजल योजनेच्या माध्यमातून 929 गावांत 465 योजना राबविण्यासाठी 599 कोटी 16 लाख, जलस्वराज्य योजनेच्या माध्यमातून पेरी अर्बन चार गावांत स्वतंत्र चार योजनांसाठी 34 कोटी 79 लाख तर शौचालय बांधणीसाठी स्वच्छ भारत मिशनमधून 4 कोटी 37 लाख रुपयांचा निधी खर्च केला जाणार आहे.

यामध्ये राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेला मार्च 2015 मध्ये केंद्र शासनाने स्थगिती दिली होती. मागील दोन वर्षांत केवळ संसद आदर्श ग्राम व गुणवत्ताबाधित गावांमध्येच योजना घेण्याचे केंद्र सरकाचे निर्देश होते. त्यामुळे मागील 2 वर्षांमध्ये खूप कमी योजना राज्यामध्ये मंजूर करण्यात आल्या होत्या. 2018-19 चा आराखडा तयार करण्यात आला. सर्वांच्या मागण्यांप्रमाणे पाणीपुरवठा योजनांचा समावेश करून 929 वाड्यावस्त्यांसाठी 465 योजना मंजूर करण्यात आल्या आहे. त्यासाठी 599 कोटी 16 लाख एवढा निधी मंजूर करण्यात आला आहे. या आराखड्यामध्ये मागील चालू असलेल्या योजनांसाठी 36 कोटी 87 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. नवीन व चालू असणार्‍या अशा 955 गाव वाड्यांसाठी 474 योजनांसाठी एकूण 636 कोटी 3 लक्षचा आराखडा अंतिमत: मान्य करण्यात आलेला आहे. दरम्यान, या अगोदर जिल्ह्यासाठी मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेच्या माध्यमातून 59 गावांसाठी 22 योजना मंजूर केल्या असून त्यासाठी 163 कोटी 64 लाख एवढा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. तसेच जलस्वराज्य टप्पा 2 मधून पेरी अर्बन 4 गावांसाठी 4 स्वतंत्र योजनांसाठी 34 कोटी 79 लाखाचा निधी मंजूर करण्यात आल्या आहेत.