होमपेज › Pune › महाराष्ट्रातून ८१ डॉक्टरांचे पथक केरळला रवाना

महाराष्ट्रातून ८१ डॉक्टरांचे पथक केरळला रवाना

Published On: Aug 20 2018 11:29AM | Last Updated: Aug 20 2018 11:28AMपुणे : प्रतिनिधी

केरळ मधील पूर परिस्थितीमुळे  तेथे साथीच्या रोगाचे आजार पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. मात्र, तेथील रुग्णांवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्र सरकार सरसावले असून, मुंबईच्या जे जे रुग्णालयातील ५५ आणि पुण्यातील ससूनचे २६ असे एकूण ८१ डॉक्टरांचे पथक व इतर स्टाफ विमानाने आज सकाळी केरळला रवाना झाले. वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन हे देखील डॉकटरांबरोबर केरळच्या तिरुअनंतपुरमला रवाना झाले आहेत. 

केरळमध्ये चार जिल्ह्यात पुरामुळे हाहाकार माजला आहे. आतापर्यंत ३७० पेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे तर ५६ हजार नागरिकांना प्रशासनाने सुरक्षित स्थळी हलविले आहे. तसेच साडे सहा लाख नागरिक विस्थापित झाले आहेत. सध्या पूर ओसरत चालला आहे पण आता त्यामुळे साथीच्या आजारांचा धोका वाढला आहे. यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात वैद्यकीय उपचार आणि गोळ्या औषधांची गरज आहे. 

आज सकाळी साडे दहा वाजताच्या विमानाने मंत्री गिरीश महाजन, डॉक्टर व इतर स्टाफ असे शंभर पेक्षा अधिक जण केरळला रवाना झाले आहेत. यामध्ये ससूनच्या २६ डॉक्टरांचा समावेश असल्याची माहिती ससूनचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांनी दिली.