Tue, Apr 23, 2019 20:16होमपेज › Pune › तब्बल 25 कोटींची  180 ई-वाहने धूळ खात

तब्बल 25 कोटींची  180 ई-वाहने धूळ खात

Published On: Apr 17 2018 2:29AM | Last Updated: Apr 17 2018 1:52AMदेवेंद्र जैन

पुणे : देशाचे रस्ते वाहतूक मंत्री हे रोज ‘ई-वाहनां’चा प्रसार करताना सामान्य माणसाला, इंधन न वापरता ही ‘ई-वाहने’ वापरण्याचा सल्ला देत आहेत. पण, या वाहनांच्या योग्य देखभाल व दुरुस्तीची सुविधा मिळत नसल्यामुळे नागरिक अशी वाहने वापरण्याचे टाळतात. मात्र, सरकारी आदेशाची आंधळेपणाने अंमलबजावणी करण्याच्या नादात, महापालिकेने खरेदी केलेली ई-वाहने धूळ खात पडली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

रस्ते वाहतूक मंत्र्यांच्या आदेशाचे पालन करण्याच्या घाईत, आधीच्या सरकारने लाखो रुपये खर्चून घेतलेल्या वाहनांचे काय करणार, याचे उत्तर मिळालेले नाही; मात्र पुणे महानगरपालिकेने अशी ‘ई-वाहने’ खरेदी करू नयेत, कारण त्याची देखभाल ही परवडण्याजोगी नाही, असा आदेश तत्कालीन आयुक्त कुणाल कुमार यांनी दिला होता; मात्र हा आदेश काढण्यापूर्वीच ही वाहने खरेदी करावी, अशी प्रशासकीय मान्यता जिल्हाधिकार्‍यांनी दिल्याचे कळते. ही वाहने पुणे महानगरपालिकेकरिता आमदार निधीतून घ्यावयाची असल्याने जिल्हाधिकार्‍यांनी त्यास प्रशासकीय मान्यता दिली आहे. जर या वाहनांची देखभाल पुणे महानगरपालिकेला परवडत नसेल, तर मग आमदारांच्या निधीतून खरेदी केलेली वाहने कशी परवडतील, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

पुणे शहरातील वैकुंठ स्मशानभूमीमध्ये खरेदी करण्यात आलेली अशी दोन वाहने धूळ खात पडलेली आहेत. सदरची वाहने तत्कालिन नगरसेवकांच्या विकास निधीतून खरेदी केल्याचे त्यावरील पाटीवरून कळते. अंत्यसंस्कार करण्यासाठी लागणार्‍या गोवर्‍या, लाकडे वाहण्यासाठी ही ‘ई-वाहने’ खरेदी करण्यात आली होती. त्यावर झालेला खर्च हा पुणे करांच्या पैशातून केलेला आहे, तसेच वैकुंठ स्मशानभूमीतील या वाहनांचा वापर अगदी नगण्य होता. संपूर्ण दिवसात ही वाहने दोन किलोमीटरचे अंतरसुद्धा कापत नव्हती. जर ही वाहने दोन किलोमीटर चालू शकत नसतील, तर ती शहरातील कचरा कसा उचलणार? 13 वाहनांच्या खरेदीवर होणारा 26 लाखांचा खर्च हा नक्‍कीच वाया जाणार, यात काही शंका नाही, अशी भीती एका ज्येष्ठ नागरिकाने व्यक्त केली.

पुणे मनपाने मागील 3 वर्षांत अशा प्रकारची 180 वाहने खरेदी केली आहेत. ही सर्व वाहने सध्या धूळखात पडलेली आहेत. कारण या वाहनांच्या दुुरुस्तीकरिता लागणारे तांत्रिक प्रशिक्षक उपलब्ध करून देण्यास पुरवठादार सपशेल अपयशी ठरले आहेत; तसेच या वाहनांच्या सुट्या भागांची मोठी कमतरता असल्याचे आढळून आले आहे. यातील लक्षणीय बाब म्हणजे, या वाहन पुरवठादाराला त्याची सर्व रक्कम देण्यात आली आहे. यात शहरातील लोकप्रतिनिधींनी पुणेकरांचे अंदाजे 25 कोटी रुपये पाण्यात घालवल्याचाच हा प्रकार असल्याची जोरदार चर्चा आहे.