Tue, Jul 23, 2019 10:43होमपेज › Pune › स्वाइन फ्लूचे आठ बळी

स्वाइन फ्लूचे आठ बळी

Published On: Sep 11 2018 1:40AM | Last Updated: Sep 11 2018 1:40AMपुणे / कोल्हापूर : प्रतिनिधी

स्वाइन फ्लूने पुन्हा थैमान घातले असून या रोगाने सोमवारी आठ रुग्णांचा बळी घेतला आहे. मृतांमध्ये पिंपरीचे 6, सांगलीचा एक तर कोल्हापूरच्या एका रुग्णाचा समावेश आहे. पिंपरी येथे या रोगाने मरण पावलेल्यांची संख्या 20 वर पोहोचली आहे. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 110 झाली आहे. तर कोल्हापुरात आणखी 10 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यात सोमवारी आणखी 10 रुग्ण आढळले. तर, 52 रुग्णांवर उपचार सूरू आहेत. 

पिंपरी-चिंचवडमध्ये सोमवारी वडगाव मावळ येथील 53 वर्षीय पुरुष, रावेत येथील 63 वर्षीय पुरुष आणि म्हाळुंगे येथे 33 वर्षीय युवकाचा, तर भोसरी येथील 25 वर्षीय तरुणी, काळेवाडी येथील 45 वर्षीय महिला आणि चिंचवड येथील 43 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. आणखी आठ नवे रुग्ण आढळले. त्यातील तिघेजण व्हेंटिलेटरवर आहेत. 28 जणांनी अद्यापपर्यंत व्हेंटिलेटवर उपचार घेतले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात डेंग्यूनंतर स्वाईन फ्लूचे संकट गंभीर होत चालले आहे.येथील खासगी रूग्णालयात सोमवारी काऊरवाडी (ता.पन्हाळा) येथील संदीप रंगराव खोत (29) व यलूर (ता.वाळवा)  येथील स्वाती राजेंद्र गायवाड (32) या दोघांचा कोल्हापूरात उपचार सुरू असताना स्वाईन फ्लूने सोमवारी मृत्यू झाला.

सर्वच पातळ्यांवर स्वाइन फ्लू आटोक्यात असल्याचा दावा केला जात असताना आणि  रुग्णांची संख्या घटल्याची आकडेवारी शासकीय पातळीवर जाहीर केली जात असतानाच स्वाइन फ्लूने पुन्हा डोके वर काढले आहे. गेल्या महिन्यापासून एक दिवसाआड दोन ते तीन जणांचा  मृत्यू झाल्याची नोंद होत आहे.

वातावरणातील बदलामुळे शहरात स्वाइन फ्लूची रुग्ण संख्या वाढत आहे. सर्दी, ताप व खोकल्याची लक्षणे दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता नागरिकांनी त्वरीत उपचार घ्यावेत. - डॉ. पवन साळवे, अतिरिक्‍त आरोग्य अधिकारी