Wed, Apr 24, 2019 19:43होमपेज › Pune › बीडीपी जमिनींसाठी 8 टक्के टीडीआर

बीडीपी जमिनींसाठी 8 टक्के टीडीआर

Published On: Jun 26 2018 1:15AM | Last Updated: Jun 26 2018 1:09AMपुणे :  पांडुरंग सांडभोर 

महापालिका हद्दीतील जैववैविध्य उद्यानाच्या आरक्षित (बीडीपी) जमिनीच्या मोबदल्यापोटी 8 टक्के इतका टीडीआर पालकमंत्री गिरीश बापट यांच्या समितीने प्रस्तावित केला आहे. त्यानुसार महापालिका प्रशासनाकडून राज्य शासनाकडे शिफारस करण्यात आली आहे. या तुटपुंज्या मोबदल्यामुळे जागा मालकांच्या तोंडाला पुन्हा पाने पुसली जाणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

महापालिका हद्दीत समाविष्ट 23 गावांमध्ये 978 हेक्टरांवर बीडीपीचे आरक्षण टाकण्यात आले आहे. त्यातील कोथरूड येथील चांदणी चौकालगतच्या पन्नास एकर बीडीपी आरक्षित जागेवर महापालिकेची शिवसृष्टी उभारण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेब्रुवारीत मंजुरी दिली. शिवसृष्टीसाठी आवश्यक जागेबरोबरच एकूणच बीडीपी आरक्षित जागा ताब्यात घेण्यासाठी किती मोबदला दिला जावा, याचा निर्णय पुण्यातील लोकप्रतिनिधींनी घ्यावा व त्यासंबंधीचा अहवाल शासनाला पाठवावा, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली होती.

त्यानुसार बापट यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील सर्व खासदार, आमदार व पालिकेतील गटनेते यांची बैठक घेण्यात आली होती. काही लोकप्रतिनिधींनी आरक्षित जमिनीचा शंभर टक्के मोबदला द्यावा, अशाही सूचना केल्या होत्या. या सर्वांच्या सूचनांचा एकत्रित विचार करून, पालकमंत्र्यांच्या समितीने बीडीपीत 8 टक्के टीडीआर प्रस्तावित केला आहे. आयुक्तांनी शासनाकडे पाठविलेल्या या प्रस्तावावर आता नगरविकास खात्याचे प्रमुख असलेले मुख्यमंत्री अंतिम शिक्कामोर्तब करणार आहेत.एकीकडे आरक्षित जमिनींना शंभर टक्के मोबदला दिला जात असताना, बीडीपीसाठी केवळ 8 टक्के टीडीआरमुळे या जागा ताब्यात घेताना मोठा विरोध होण्याची शक्यता असून, त्यामुळे बीडीपी आरक्षणाला खीळ बसण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर पालिकेच्या शिवसृष्टीचा प्रकल्पसुद्धा कागदावरच राहण्याची भीती आहे.