Thu, Jul 18, 2019 08:04होमपेज › Pune › बीडीपीत ८ टक्के टीडीआरवर शिक्कामोर्तब; शिवसृष्ट्रीचा मार्गही मोकळा

बीडीपीत ८ टक्के टीडीआरवर शिक्कामोर्तब; शिवसृष्ट्रीचा मार्गही मोकळा

Published On: Aug 18 2018 3:26PM | Last Updated: Aug 18 2018 3:21PMपुणे :  प्रतिनिधी

महापालिकेत समाविष्ट २३ गावामधील जैववैविध उद्यानाच्या (बीडीपी) आरक्षित जमिनीसाठी ८ टक्के टीडीआर देण्यावर राज्य शासनाने अखेर शिक्कामोर्तब केला आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला बीडीपी मोबदल्याचा प्रश्न निकाली निघाला असून महापालिकेच्या शिवसृष्टीचा मार्गही मोकळा झाला आहे.

महापालिका हद्दीत झालेल्या २३ गावामधील डोंगर माथा- उतारावरील ९७८ हेकटर क्षेत्रावर बीडीपीचे आरक्षण टाकण्यात आले आहे. त्यावर तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी २०१४ मध्ये शिक्कामोर्तब केला. मात्र बीडीपी आरक्षित जमिनी ताब्यात घेण्यासाठीचा मोबदला निश्चित करण्यात आला नव्हता. त्यामुळे आरक्षणाचे घोंगडे भिजत पडले होते, तर दुसरीकडे आरक्षित जमिनीवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरू होती. त्यामुळे बीडीपीला हरताळ फासला जात होता. 

दरम्यान चांदणी चौकातील बीडीपीच्या आरक्षित जागेत शिवसृष्टी प्रकल्प उभारण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यानी जाहीर केला होता. त्यावेळेस बीडीपीसाठी निर्णय घेण्यासाठी पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील लोकप्रतिनिधींची समिती नेमण्यात आली होती. या समितीने बीडीपीच्या मोबदल्यासाठी ८ टक्के टीडीआर देण्याची शिफारस केली होती. यासंबंधीचे वृत्त दै. पुढारीने सर्वप्रथम दिले होते. दरम्यान पालकमंत्र्यानी केलेल्या शिफारशीनुसार नगरविकास खात्याने आज, शनिवारी ८ टक्के टीडीआरच्या निर्णयाचे आदेश काढले आहेत.