Sat, Jul 20, 2019 09:12होमपेज › Pune › चार वर्षांत 780 सराईत तडीपार

चार वर्षांत 780 सराईत तडीपार

Published On: Feb 09 2018 2:01AM | Last Updated: Feb 09 2018 1:32AMपुणे : पुष्कराज दांडेकर

पुण्यातील गुन्हेगारी टोळ्या व सराईत गुन्हेगारांचे वर्चस्व मोडून काढण्यासाठी पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईचा धडाका सुरू केला आहे.  मागील चार वर्षात मुंबई पोलिस कायद्याच्या विविध कलमांनुसार 780 सराइतांना शहर व जिल्ह्याच्या हद्दीतून तडीपार केले आहे. यामध्ये काही गुन्हेगारी टोळ्यांचा समावेश आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर शहरातील गुन्हेगारी टोळ्यांचे वर्चस्व मोडीत निघाले आहे. तर अजूनही शहरात उपद्रव करणार्‍या अनेक गुंडांवर तडीपारीची कारवाई प्रस्तावित आहे. पुणे शहराची लोकसंख्या वाढली तशी चाकरमानी व मध्यमवर्गाची संख्या वाढली. त्यासोबतच शहरातील झोपडपट्ट्या तसेच औद्योगिक भरभराटीमुळे औद्योगिक वसाहती वाढल्या आहेत. मात्र या ठिकाणी व शहरातील मध्यवस्तीत गुन्हेगारी कृत्ये करणार्‍या गुन्हेगारांचीही संख्या वाढली आहे. या परिसरांमध्ये उद्योजक, व्यावसायिक यांच्याकडून हप्ते वसुली, खंडणी मागण्यासारखे गंभीर गुन्हे या सराइतांकडून केले जातात. तसेच परिसरात आपले वर्चस्व अबाधित राखण्यासाठी हे सराईत सर्रासपणे परिसरात मारामारी, खुनाचा प्रयत्न, खून, जबरी चोरी, लूट असे गंभीर गुन्हे करतात. या गुन्हेगारांच्या दहशतीमुळे नागरिकही त्यांच्याविरोधात तक्रार देण्यास पुढे येत नाहीत. मागील काही वर्षात पुण्यात गुन्हेगारी टोळ्यांनी धुमाकूळ घातला होता. या टोळ्यांमधील वर्चस्ववादातून धुमश्‍चक्रीही घडल्या. या वर्चस्ववादातून अनेकदा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला आहे. त्यामुळे शांत व वैचारिक चळवळींचे केंद्र समजले जाणार्‍या शहराची शांतता व कायदा सुव्यवस्था धोक्यात आली होती. त्यानंतर अशा सराईत गुन्हेगारांना हेरून त्यांच्या कारवायांना आवर घालण्यासाठी त्यांना शहर व जिल्हा परिसरातून तडीपार करण्याचे प्रस्ताव संबंधित परिमंडळाच्या उपायुक्तांकडे पाठविण्यात आले. शहराची शांतता व कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगारांच्या  रेकॉर्डची पडताळणी करून त्या त्या परिमंडळाच्या उपायुक्तांकडून या सराइतांना तडीपार करण्याचे आदेश पारीत करण्यात आले. मागील चार वर्षात तब्बल 782 सराईत गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली. 

पुणे शहरातील चारही परिमंडळातील विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीतून 2014 मध्ये  208, 2015 मध्ये 167, 2016 मध्ये 135 तर 2017 मध्ये सर्वाधिक 280 सराईत गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. तर यंदाही 2018 मध्ये शहरातील शांततेवर घाला आणणार्‍या अनेक गुंडांना तडीपार करण्याचे प्रस्तावित आहे. 

तडीपारीच्या कारवाईत गुन्हेगार पुण्यातही येतात. याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होते. मात्र ते शहरात येऊ नयेत यासाठी काही उपाययोजनाही केल्या जातात. झोपडपट्ट्यांमध्ये ‘कोम्बिंग ऑपरेशन’ आणि इतर उपाययोजना केल्या जात असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. तडीपारीचा भंग करणार्‍यांवरही कारवाई करण्यात येते.