Sun, Mar 24, 2019 08:18होमपेज › Pune › 75 टक्के रक्कम मिळणार

75 टक्के रक्कम मिळणार

Published On: Jun 26 2018 1:16AM | Last Updated: Jun 25 2018 10:21PMपिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिका अधिकारी व कर्मचार्‍यांना धन्वंतरी योजनेअंतर्गत पॅनेलवरील रुग्णालयात वैद्यकीय उपचार घेण्याची परवानगी आहे. मात्र, तातडीच्या उपचारांकरिता पॅनेलबाहेरील रुग्णालयातील उपचारांची माहिती 116 तासांत पालिका प्रशासनाला कळविली नाही तरीदेखील त्या कर्मचार्‍याला मूळ बिलाच्या 75 टक्के रक्कम देण्यात येणार आहे. त्याचबरोबर पालिकेत कार्यरत असलेल्या अन्न परवाना विभागातील 6 निरीक्षकांनाही उपचाराची रक्कम देण्याचा निर्णय उपसूचनेद्वारे घेण्यात आला आहे.

महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत या निर्णयाला मान्यता देण्यात आली आहे. पालिका आस्थापनेवर सुमारे 7 हजार 500 अधिकारी व कर्मचारी विविध पदावर कार्यरत आहेत. हे सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांसह त्यांच्या कुटुंबियांना धन्वंतरी योजनेअंतर्गत वैद्यकीय उपचार केले जातात. यामध्ये सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचार्‍यांचादेखील समावेश करण्यात आला आहे. याकरिता कार्यरत व सेवानिवृत्तांच्या सेवानिवृत्ती वेतनातून ठराविक रक्कम कपात केली जाते.

यापूर्वी पालिका कर्मचारी कोणत्याही रुग्णालयात दाखल होऊन उपचार घेत असत. मात्र, अगदी किरकोळ कारणासाठीदेखील हे कर्मचारी शहर अथवा हद्दीबाहेरच्या रुग्णालयात दाखल होत असत. तसेच या रुग्णालयाची अव्वाच्या सव्वा रकमेची बिले असत. या प्रकाराला आळा घालण्यासाठी सरसकट रुग्णालयांऐवजी धन्वंतरी योजनेअंतर्गत शहर व हद्दीबाहेरील ठराविक रुग्णालयांची यादी वैद्यकीय विभागाने जाहीर केली. त्यामुळे हा खर्च काही प्रमाणात आटोक्यात आला. यात आणखी एक बदल करत, पॅनेलवरील कोणत्याही रग्णालयात उपचार घेण्यासाठी दाखल होण्यापूर्वी वैद्यकीय विभागाची ‘रेफर चीट’ घेऊन जाणे बंधनकारक करण्यात आले आहे.

दरम्यान, अनेक कर्मचारी हद्दीबाहेर राहत असल्याने, पॅनेलवरील रुग्णालये त्यांच्या निवासस्थानापासून दूर अंतरावर आहेत. हे कर्मचारी अथवा त्यांच्या कुटुंबातील सदस्य आपत्कालीन  परिस्थितीत वैद्यकीय उपचारांकरिता जवळच्या रुग्णालयात दाखल झाल्यास, त्यांना धन्वंतरी योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागत असायचे. याबाबत वैद्यकीय विभागाकडे तक्रारी प्राप्त झाल्याहोत्या. महापालिका कर्मचार्‍याला तातडीने गंभीर स्वरुपाच्या आजारासाठी पॅनेल बाहेरील रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले असेल, अशा कर्मचार्‍याने वैद्यकीय विभागाला अपवादात्मक परिस्थितीत 116 तासांच्या आत कळविले नसले, तरीदेखील या बिलाची 75 टक्के रक्कम किंवा धन्वंतरीच्या दराप्रमाणे बिलाची रक्कम देण्यात येणार आहे. तसेच, अन्न परवाना विभागातील 6 निरीक्षकांनाही या योजनेचा लाभ देण्याबाबत उपसूचनेद्वारे मंजुरी देण्यातआली आहे.