Wed, Feb 20, 2019 02:37होमपेज › Pune › वैद्यकीय उपचारासाठी बिलाच्या 75 टक्के रक्कम

वैद्यकीय उपचारासाठी बिलाच्या 75 टक्के रक्कम

Published On: May 15 2018 1:32AM | Last Updated: May 14 2018 11:54PMपिंपरी : प्रतिनिधी

महापालिका अधिकारी व कर्मचार्‍यांना धन्वंतरी योजनेअंतर्गत पॅनेलवरील रुग्णालयात वैद्यकीय उपचार घेण्याची परवानगी आहे. मात्र, तातडीच्या उपचारांकरिता पॅनेलबाहेरील रुग्णालयातील उपचारांची माहिती 116 तासांत  पालिका प्रशासनाला कळविली नाही. तरीही, त्या कर्मचार्‍याला मूळ बिलाच्या 75 टक्के रक्कम देण्यात येणार आहे. पालिका आयुक्तांनी याबाबतचा प्रस्ताव पालिकेच्या दि. 19 मे च्या सभेपुढे मान्यतेसाठी ठेवला आहे.

महापालिका आस्थापनेवर सुमारे साडेसात हजार अधिकारी व कर्मचारी वर्ग एक व चारच्या विविध पदावर कार्यरत आहेत. हे सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांसह त्यांच्या कुटुंबीयांना धन्वंतरी योजनेअंतर्गत वैद्यकीय उपचार दिले जातात. यामध्ये सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचार्‍यांचादेखील समावेश करण्यात आला आहे.यापूर्वी महापालिका कर्मचारी अगदी किरकोळ कारणासाठीदेखील शहर अथवा हद्दीबाहेरच्या रुग्णालयात दाखल होत. तसेच या रुग्णालयाची अव्वाच्या सव्वा रकमेची बिले येत. याला आळा घालण्यासाठी सरसकट रुग्णालयांऐवजी धन्वंतरी योजनेअंतर्गत शहर व हद्दीबाहेरील ठराविक रुग्णालयांची यादी वैद्यकीय विभागाने जाहीर केली. त्यामुळे या खर्चवर काही प्रमाणात नियंत्रण आले. यात आणखी  बदल करत, पॅनेलवरील कोणत्याही रुग्णालयात उपचार घेण्यासाठी दाखल होण्यापूर्वी वैद्यकीय विभागाची रेफर चीट घेऊन जाणे बंधनकारक करण्यात आले आहे. 

दरम्यान, अनेक कर्मचारी हद्दीबाहेर राहत असल्याने, पॅनेलवरील रुग्णालये त्यांच्या निवासस्थानापासून दूर अंतरावर आहेत. हे कर्मचारी अथवा त्यांच्या कुटुंबातील सदस्य आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय उपचारांकरिता नजीकच्या रुग्णालयात दाखल झाल्यास, त्यांना धन्वंतरी योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागत होते. याबाबत वैद्यकीय विभागाकडे तक्रारी प्राप्त झाल्यने महापालिका कर्मचार्‍याला तातडीने गंभीर स्वरुपाच्या आजारासाठी पॅनेल बाहेरील रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले असेल, अशा कर्मचार्‍याने वैद्यकीय विभागाला अपवादात्मक परिस्थितीत 116 तासांच्या आत कळविले नसले, तरीदेखील या बिलाची 75 टक्के रक्कम किंवा धन्वंतरीच्या दराप्रमाणे बिलाची रक्कम देण्यात येणार आहे.