Mon, Apr 22, 2019 05:51होमपेज › Pune › पीएमपीएलमध्ये 73 चालकांची भरती; 200 वाहकही होणार रुजू

पीएमपीएलमध्ये 73 चालकांची भरती; 200 वाहकही होणार रुजू

Published On: Jun 28 2018 1:34AM | Last Updated: Jun 28 2018 1:16AMपुणे : प्रतिनिधी

चालकांअभावी बसच्या रखडणार्‍या फेर्‍या पूर्ववत करण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या वतीने नव्याने 73 चालकांची भरती करण्यात आली आहे. त्यामुळे विविध रस्त्यांवर वेळेत बसची वारंवारिता वाढण्यास मदत होणार आहे. महामंडळाच्या ताफ्यात 2 हजार 33 बसेसपैकी दरदिवशी सरासरी फक्त 1 हजार 300 ते 1 हजार 400 बसेस रस्त्यावर धावतात. तांत्रिक बिघाड, मनुष्यबळाची कमतरता यामुळे काही बसेस रस्त्यावर येत नव्हत्या. मात्र, आता पीएमपीमध्ये चालक, वाहक भरती झाली असून, बुधवारपासून 73 चालक कामावर रुजू झाले आहे. तर येत्या काही दिवसात जवळपास 200 वाहक कामावर रुजू होणार आहेत. 

प्रवाशांची ने-आण करण्यासाठी बसेसवर नव्याने वाहक आणि चालकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे महामंडळाच्या उत्पन्नात भर पडणार आहे. प्रवाशांची जीवनवाहिनी असलेल्या पीएमपीच्या ताफ्यात 2 हजार 33 बसेस आहेत. यामध्ये महामंडळाच्या मालकीच्या 1 हजार 440 बस आहेत. उर्वरित 653 बस ठेकेदारांकडून चालवल्या जात आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील लोकसंख्येच्या तुलनेत सध्याच्या बसेसची संख्या कमी आहे. दररोज विविध मार्गावर धावणार्‍या बसेसचे नियोजन केले जाते. नियोजनानुसार 1 हजार 700 ते 1 हजार 800 बसेस धावण्याचे निश्‍चित केले जाते. मात्र, प्रत्यक्षात दररोज सरासरी 1 हजार 300 ते 1 हजार 400 बसेस मार्गावर धावत असतात.

पर्यायाने पीएमपीच्या नियोजित फेर्‍यापैकी जवळपास 4 हजार फेर्‍या दररोज रद्द कराव्या लागत आहेत. मनुष्यबळाची कमतरता, तांत्रिक बिघाड यामुळे या बसेस मार्गावर धावत नाहीत. याचा मनस्ताप प्रवाशांना सहन करावा लागत असून, पीएमपीच्या उत्पन्नावरदेखील याचा परिणाम होतो. या पार्श्‍वभूमिवर पीएमपीकडून चालक, वाहक भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती. गेल्या काही महिन्यात प्रक्रिया राबवण्यात आली. त्यानुसार बुधवार (दि.27) रोजी 73 वाहन चालक कामावर रुजू करण्यात आले आहेत तर जवळपास 200 वाहक येत्या काही दिवसात नव्याने रूजू होणार आहेत. नव्याने कर्मचारी भरती झाल्यामुळे पीएमपीच्या कामकाजात सुधारणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे प्रत्यक्ष मार्गावर धावणार्‍या बसेसच्या संख्येतही वाढ होण्याची शक्यता पीएमपीतील अधिकार्‍यांनी व्यक्त केली आहे.