होमपेज › Pune › मेट्रो  मार्गिकेत 700 मीटरनी वाढ

मेट्रो  मार्गिकेत 700 मीटरनी वाढ

Published On: Jul 18 2018 1:54AM | Last Updated: Jul 17 2018 10:54PMपिंपरी : मिलिंद कांबळे

पिंपरी-चिंचवड शहरात दापोडी हॅरिस पूल ते मोरवाडी, पिंपरी असे पुणे मेट्रोचे अंतर होते. मात्र, रिव्हर्स लाईन व मेंटेनन्स लाईनसाठी मेट्रोची मार्गिका आणखी सुमारे 700 मीटरनी पुढे वाढविण्यात आली आहे. आता मेट्रो चिंचवडचा एम्पायर इस्टेट (मदर तेेरेसा) पूल ओलांडून जाणार आहे. त्यामुळे शहराला निगडीच्या दिशेने जाण्याच्या मार्गाची थोडी का होईना भेट मिळाली आहे. 

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वतीने मोरवाडी ते स्वारगेट असा 16.58 किलोमीटर आणि वनाज ते रामवाडी 14.66 किलोमीटर असे  एकूण 31.58 किलोमीटर अंतर मेट्रो मार्गिका पहिल्या टप्पात बांधण्यात येणार आहे. रेंजहिल्स ते मोरवाडी अंतर 11.57 किलोमीटर आहे. हॅरिस पूल ते खडकी रेल्वे फाटकापर्यंत हे अंतर पुणे महापालिका हद्दीत येते तर, फाटक ते रेंजहिल्सपर्यंतचे अंतर खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड व अ‍ॅम्युनिशन फॅक्टरीच्या क्षेत्रात आहे. शहरातील दापोडी ते मोरवाडीतील सेंट्रल मॉलपर्यंतचे अंतर सुमारे 7.15 किलोमीटर आहे.  मात्र, मेट्रोची रिव्हर्स लाईन व मेटनन्स लाईनसाठी हे अंतर सुमारे 700 मीटरने  वाढविण्यात आले आहे. त्यामुळे मेट्रोची मार्गिका चिंचवडच्या एम्पायर इस्टेट उड्डाणपूल ओलांडून जाणार आहे.  या नव्या अंतराच्या ‘डीपीआर’ला मेट्रो व्यवस्थापनाने मान्यता दिली  आहे. 

दरम्यान, मोरवाडी ते निगडीच्या भक्ती-शक्ती समुह शिल्प चौकापर्यंत सुमारे 5 किमीच्या मेट्रो मार्गिकेच्या डीपीआरचे काम अंतिम टप्प्यात आहे. लवकरच तो पालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे सुपूर्द केला जाणार आहे. शासनाने निधी उपलब्ध करून दिल्यानंतर काम सुरू केले जाणार आहे.मेट्रोची मार्गिका पूर्वी मोरवाडी चौकातील सेंट्रल मॉलपर्यंत होती. मात्र, रिव्हर्स व मेंटनन्स लाईनसाठी अधिक अंतराची गरज असल्याने मेट्रो आणखी सुमारे 700 मीटर पुढे वाढविण्यात आली. त्यानुसार कामासही सुरूवात झाली आहे. एम्पायर इस्टेट पूल ओलांडून मेट्रोचे  पिलर उभे राहतील. हे पिलर उड्डाणपुलापेक्षा 9.5 मीटर व रस्त्यापासून 19.13 मीटर उंच असतील, असे मेट्रोच्या रिच वनचे मुख्य प्रकल्प व्यवस्थापक गौतम बिर्‍हाडे यांनी सांगितले. 

तीन पुलांवरून मेट्रोचा मार्ग

चिंचवड ते रेंजहिल्स मार्गावर तब्बल 4 पुलांवरून मेट्रो धावेल. चिंचवडमधील मदर तेरेेसा उड्डाणपूल, कासारवाडी, नाशिक फाटा चौकातील भारतरत्न जेआरडी टाटा व दापोडीतील हॅरिस पुलावरून मेट्रो धावणार आहे. तसेच, खडकी पोलिस ठाण्याशेजारच्या रेंजहिल्स येथून रेल्वेमार्गावरून मेट्रो जाईल. शहरात खराळवाडी, शंकरवाडी, कासारवाडी असे 3 ठिकाणी मेट्रो मार्गिका वळण घेईल.