Sat, Apr 20, 2019 23:52होमपेज › Pune › तब्बल ७ हजार वाहनांना आरटीओकडून ‘ग्रीन सिग्नल’

तब्बल ७ हजार वाहनांना आरटीओकडून ‘ग्रीन सिग्नल’

Published On: Feb 13 2018 2:01AM | Last Updated: Feb 13 2018 12:49AMपुणे : नवनाथ शिंदे

प्रादेशिक परिवहन कार्यालयातील कर्मचार्‍यांच्या तत्परतेमुळे अवघ्या 55 दिवसांत तब्बल 7 हजारांवर वाहनांना ‘फिटनेस’चा ‘ग्रीन सिग्नल’ देण्यात आला आहे. तसेच नुकतेच उभारण्यात आलेल्या चार नवीन ट्रॅकमुळे फिटनेस तपासणीचा दररोजचा आकडा 250 वर गेला आहे.

उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे राज्यातील वाहनांची फिटनेस तपासणी जमिनीवरील ट्रॅकवर करणे बंधनकारक करण्यात आले होते. दरम्यान, पुणे आरटीओ कार्यालयांतर्गत फिटनेस ट्रॅकचे काम झेंडेवाडी (सासवड) येथे सुुरू असल्यामुळे वाहनांचे पासिंग बंद करण्यात आले होते. ट्रॅकचे काम पूर्ण झाल्यानंतर आरटीओने 20 नोव्हेंबरपासून  वाहनांच्या फिटनेस तपासणीची सुरुवात केली. फिटनेसचा एकच ट्रॅक उपलब्ध असल्यामुळे दरदिवशी केेवळ 75 वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्राचे नूतनीकरण करण्यात येत होते. 22 जानेवारीपासून अतिरिक्त दोन ट्रॅक उपलब्ध करण्यात आल्यामुळे अतिरिक्त 75 वाहनांची तपासणी सुरू करण्यात आली.  

मोटार वाहन निरीक्षक, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या अथक प्रयत्नांमुळे आणि सुटीच्या दिवशी कामाला प्राधान्य दिल्यामुळे सध्या दिवसाला 250 वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. तसेच संघटनांची मागणी आणि रिक्षाचालकांच्या व्यवसायानुरूप शहरातील पासिंगअभावी रखडलेल्या रिक्षांची फिटनेस तपासणी करण्यासाठी पिंपरी-चिंचवडच्या टेस्ट ट्रॅकवर सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. त्यामुळे रिक्षाचालकांची फक्त पासिंगसाठी 35 किलोमीटरवर जाण्यापासून सुटका झाली आहे. 

आरटीओच्या वतीने झेंडेवाडी (सासवड)परिसरात असलेल्या ट्रॅकवर 20 नोव्हेंबर ते 31 जानेवारीच्या कालखंडात 6 हजार 736 वाहनांच्या फिटनेसचे नूतनीकरण करण्यात आले आहे. त्यामध्ये 18 रुग्णवाहिका, 4 हजार 85 मालवाहतूक वाहने, 1 हजार 28 रिक्षा, 826 मोटार कॅब, 779 बसेसचा समावेश आहे. प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी यांच्या मार्गदर्शनाखाली उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत, विनोद सगरे ऑनलाईन अ‍ॅपाइंटमेंटद्वारे नोंदणी करण्यार्‍या वाहनांचे पासिंग करण्यासाठी काम करत आहेत.