Tue, May 21, 2019 18:57होमपेज › Pune › पुण्यातील ७ नगरसेवकांची पदे रद्द

पुण्यातील ७ नगरसेवकांची पदे रद्द

Published On: Sep 11 2018 1:40AM | Last Updated: Sep 11 2018 1:04AMपुणे : प्रतिनिधी

महापालिकेच्या सात नगरसेवकांचे पद रद्द करण्याच्या अहवालावर आयुक्‍त सौरभ राव यांनी सोमवारी स्वाक्षरी केली. यासंबंधीचा अहवाल नगरविकास विभागाला पाठविण्यात आला असून, त्यावर ते अंतिम शिक्‍कामोर्तब करतील, असे राव यांनी स्पष्ट केले. पद रद्द झालेल्या सात नगरसेवकांमध्ये सत्ताधारी भाजपचे पाच, तर राष्ट्रवादीच्या दोन नगरसेवकांचा समावेश आहे. 

भाजपच्या नगरसेविका किरण जठार, कविता वैरागे, वर्षा साठे, आरती कोंढरे, फरजाना शेख, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुक्साना इनामदार आणि किशोर ऊर्फ बाळा धनकवडे असे पदे झालेल्या नगरसेवकांची नावे आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षित प्रभागातून निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांना सहा महिन्यांच्या मुदतीत जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. 

यासंबंधीच्या एका याचिकेवर निकाल देताना, सर्वोच्च न्यायालयाने कोल्हापूर महापालिकेच्या वीस नगरसेवकांची पदे रद्द ठरविली आहेत. त्यामुळे न्यायालयाचा हा निकाल सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांना लागू झाला आहे. या नगरसेवकांवर कारवाई करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने सर्व विभागीय आयुक्‍त आणि महापालिका आयुक्‍तांना गत आठवड्यात दिले होते. त्यानुसार पुणे महापालिकेतील सात नगरसेवकांची पदे रद्द आयुक्‍त राव यांनी रद्द ठरविली आहेत. आता नगरविकास खात्याकडून त्यावर अंतिम आदेश काढले जाणार आहेत. नगरविकास खात्याचे आदेश म्हणजे आता केवळ औपचारिकता असल्याचेही राव यांनी स्पष्ट केले. 

आयुक्‍तांच्या आदेशानुसार आता या नगरसेवकांना महापालिकेच्या कामकाजात भाग घेता येणार नाही, त्याचबरोबर त्यांना निधीही खर्च करता येणार नाही. रद्द झालेल्या प्रभागात पुन्हा सहा महिन्यांच्या आत पोटनिवडणुका घ्याव्या लागणार आहेत.

सत्ताधारी भाजपला झटका

पद रद्द झालेल्या नगरसेवकांमध्ये सत्ताधारी भाजपच्या पाच नगरसेविकांचा समावेश असल्याने या पक्षाला मोठा झटका बसला आहे. भाजपचे संख्याबळ त्यामुळे आता 98 वरून 93 वर आले आहे, तर राष्ट्रवादीचे संख्याबळ 42 वरून 40 वर आले आहे. आता सत्ताधारी आणि विरोधक यांना पुन्हा पोटनिवडणुकीला सामोरे जावे लागणार असून, त्यात सत्ताधार्‍यांबरोबर विरोधकांचाही कस लागणार आहे.