Thu, Apr 25, 2019 17:31होमपेज › Pune › ७/१२ ऑनलाईनची घोषणा हवेतच

७/१२ ऑनलाईनची घोषणा हवेतच

Published On: Apr 30 2018 1:45AM | Last Updated: Apr 30 2018 12:56AMपुणे : नरेंद्र साठे/समीर सय्यद

महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नुकतीच पुण्यामध्ये दि.1 मे पासून राज्यात ऑनलाईन सातबारा मिळेल अशी घोषणा केली होती. मात्र, प्रत्यक्षात चंद्रकांत पाटील यांच्या विभागातील पुणे, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यामध्ये सरासरी 65 टक्केच कामे झाली आहेत. त्यामुळे पाटील यांची घोषणा पुन्हा फोल ठरण्याची शक्यता दिसून येत आहे. मात्र, प्रशासनाकडून दि.1 मे पर्यंत राज्यातील सर्व सातबारा ऑनलाईन होईल असा दावा करण्यात आला आहे.

पुणे विभागातील सांगली आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये 99 टक्क्यांपर्यंत कामे झाली आहेत. परंतु कोल्हापूरसारख्या जिल्ह्यात केवळ 50 टक्केच काम पूर्ण झाल्याचे दि.24 एप्रिलच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते. तर राज्यामध्ये दहा टक्के ऑनलाईन सातबार्‍याची कामे शिल्लक आहेत. यामध्ये सर्वात कमी रत्नागिरी 25 टक्के, सिंधूदुर्ग 34 टक्केच ऑनलाईनची कामे पूर्ण झाली आहेत. महसूल विभागाकडून आतापर्यंत अनेकवेळा संपूर्ण राज्यात सातबारा ऑनलाईन मिळेल, अशी घोषणा केली होती. राज्यातील 43 हजार 948 गावांपैकी 39 हजार 555 गावांमध्ये ऑनलाईन सातबारा मिळत आहे. 

राज्यातील साताबारा उतारा 2002 पासून संगणकीकृत करण्यात आले होते. मात्र, त्यात मोठ्याप्रमाणात चुका आढळून येत होत्या. त्यामुळे शेतकर्‍यांना अडचणींना सामोरे जावे लागत होते. शेतकर्‍यांना अचूक संगणकीकृत 7/12 देण्यासाठी राज्याच्या भूमी अभिलेख शाखेकडून केंद्र पुरस्कृत डिजिटल इंडिया लँड रेकॉर्ड मॉडर्नायझेशन प्रोग्राम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत पुण्याच्या राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राने ई-फेरफारची प्रणाली विकसित केली आहे. 

शंभर टक्के ऑनलाईन सातबारा झालेले जिल्हे

अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, विशिम, उस्मानाबाद, जालना, रायगड, नागपूर, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात 100 टक्के काम झाले आहे.

सर्वात कमी टक्के काम झालेले जिल्हे

रत्नागिरी 25.80, सिंधूदुर्ग 34.21, कोल्हापूर 50.73, सातारा, 65.89, पुणे जिल्हा 66.46 टक्के, ठाणे 80.69, पालघऱ 80.88, नाशिक 86.48 तर अन्य जिल्ह्यांनी नव्वदी पार केली आहे.

अडीच लाख सातबारावर डिजिटल स्वाक्षरी

राज्यातील शेतकर्‍यांना सातबारा उतारा बिनचूक ऑनलाईन देण्यासाठी युद्धपातळीवर काम  सुरू आहे. पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यात काम संथगतीने सुरू होते. राज्यातील 250 तालुके पूर्ण काम झाले असून येथील सातबारा उतारावर डिजिटल स्वाक्षरीची मोहीम हाती घेण्यात आले आहे. आतापर्यंत 2 लाख 60 हजार सातबारा उतार्‍यांवर डिजिटल स्वाक्षरी झाली आहे.- रामदास जगताप, राज्याचे ई-फेरफर समन्वयक तथा उपजिल्हाधिकारी