Mon, Jun 17, 2019 19:03होमपेज › Pune › ६७४ विद्यार्थी आरटीई प्रवेशापासून वंचित

६७४ विद्यार्थी आरटीई प्रवेशापासून वंचित

Published On: Apr 27 2018 1:06AM | Last Updated: Apr 27 2018 12:39AMपुणे : प्रतिनिधी 

पुणे जिल्ह्यातील 56 शाळांमध्ये आरटीई प्रवेशाच्या पहिल्या लॉटरीत प्रवेश मिळालेल्या तब्बल 674 विद्यार्थ्यांना अद्यापदेखील प्रवेश देण्यात आले नसल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे प्रवेश करून, दुसरी लॉटरी काढायची की, या विद्यार्थ्यांनाच दुसर्‍या लॉटरीत प्रवेश द्यायचा यावरून दुसर्‍या फेरीची लॉटरी लांबणीवर पडली असल्याची माहिती शिक्षण विभागातील सूत्रांनी दिली आहे.

शुल्क प्रतिपूर्तीचे कारण देत ‘इसा’ने दाखल केलेल्या याचिकेवर औरंगाबाद खंडपीठाने, ‘शुल्क प्रतिपूर्तीचे कारण पुढे करून शाळांना विद्यार्थ्यांचे प्रवेश नाकारता येणार नाहीत,’ असे सांगून प्रवेश देण्यास सांगितले आहे. परंतु, पुणे जिल्ह्यातील 56 शाळांनी 674 विद्यार्थ्यांना पहिल्याच फेरीत आरटीईचे प्रवेश दिले नाहीत. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या जागा राखीव ठेवण्यात आल्या असून, त्यांना प्रवेश देऊन दुसरी फेरी राबवायची, की दुसर्‍या फेरीत या विद्यार्थ्यांना प्रवेश द्यायचे याबाबत कार्यवाही कशी करायची, याबाबतचे मार्गदर्शन शिक्षण विभागाकडून मागविण्यात आले आहे.

त्यामुळे पुणे जिल्ह्याची प्रवेशाची दुसरी लॉटरी रखडली आहे. दरम्यान, शिक्षण विभागाने आरटीई प्रवेशाच्या शुल्क प्रतिपूर्तीसाठी 303 कोटी रुपये शाळांना पाठविले आहेत. मात्र, काही तांत्रिक अडचणींमुळे ही रक्कम शाळांना पोहोचण्यात उशीर होत आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत शाळांना ही रक्कम मिळेल. आरटीई प्रवेशाचा निर्णय सरकारच्या बाजूने लागला आहे. त्यामुळे शाळांना विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावेच लागणार आहेत.