Thu, Jul 18, 2019 10:12होमपेज › Pune › १४ महिन्यांत बाललैंगिक अत्याचारांच्या ६५३ घटना

१४ महिन्यांत बाललैंगिक अत्याचारांच्या ६५३ घटना

Published On: Feb 19 2018 1:37AM | Last Updated: Feb 19 2018 1:29AMपुणे : महेंद्र कांबळे 

वाढते बलात्कार आणि त्यातही निरागस व कोवळ्या वयातील मुलींवरील अत्याचारांत दिवसेंदिवस वाढ होत आहे. बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा लागू झाल्यानंतर याअंतर्गत दाखल प्रकरणांमध्ये दरवर्षी वाढ होत आहे.  पुणे जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांतील मागील 14 महिन्यांमध्ये बाललैंगिक अत्याचारांचे तब्बल 653 गुन्हे दाखल झालेले आहे. चिंतेचा विषय सुशिक्षित, उच्चपदस्थ अधिकारी, न्यायाधीश, शाळेचे मुख्याध्यापक अशा प्रतिष्ठेच्या पदावर काम करणार्‍यांनी कोवळ्या कळ्या कुस्करण्याचे कुकर्म केल्याचे जळजळीत वास्तव दाखल झालेल्या प्रकरणांतून दिसून आले आहे. 

पुणे जिल्ह्यात  2013 मध्ये बाललैंगिक अत्याचारांचे 148 गुन्हे दाखल झाले. यामध्ये 2014 मध्ये दुप्पट वाढ होऊन हा आकडा 369 वर पोहोचला. 2015 मध्ये  449 तर 2017 मध्ये त्यात आणखी वाढ होऊन 578 गुन्हे घडले; तर चिंताजनक म्हणजे, चालू वर्षाच्या अवघ्या 48 दिवसांमध्ये 75 बाललैंगिक अत्याचारांचे गुन्हे दाखल केले. बालकांच्या हक्काच्या संरक्षणाप्रती न्याय्य हक्कांसाठी ‘लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण कायदा- 2012’ लागू करण्यात आला आहे.   

अठरा वर्षांखालील मुलाला किंवा मुलीला स्पर्श न करता केला जाणारा लैंगिक अत्याचार म्हणजे अश्‍लील चित्रे दाखविणे, अश्‍लील हावभाव करणे, भाषा वापरणे, लैंगिक अवयव दाखविणे, स्पर्श करणे म्हणजे हात लावणे व लैंगिकदृष्ट्या कुरवाळणे, मिठी मारणे, चुंबन घेणे तसेच बलात्कार किंवा बलात्काराचा प्रयत्न करणे अशी विविध कृत्ये बाललैंगिक अत्याचाराच्या प्रकारात मोडतात. विविध कलमांनुसार 3 वर्षांपासून जन्मठेपेपर्यंत शिक्षा व दंडाची तरतूद आहे. 

सुशिक्षितांचाही सहभाग

शिक्षक, उच्चपदस्थ अधिकारी, न्यायाधीश, शाळेचे मुख्याध्यापक अशा प्रतिष्ठेच्या पदावर काम करणार्‍यांवरही बाललैंगिक अत्याचारांचे गुन्हे दाखल करण्यात आल्याची परिस्थिती आहे. यामध्ये अल्पवयीन मुलींना लग्नाचे आमिष दाखवून त्यांचे अपहरण करून लैंगिक अत्याचारांच्या घटनांमध्ये 25 वर्षांखालील आरोपींचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. पीडित मुलीवर कोणत्याही प्रकारचा दबाव येऊ नये यासाठी  तिची इनकॅमेरा साक्ष घेतली जाते. वाढत्या खटल्यांची स्थिती पाहता बाललैंगिक अत्याचारांच्या खटल्यांसाठी विशेष न्यायालये कमी पडत आहेत. 

गुन्ह्याचे स्वरूप व शिक्षा 

गुन्हा करणे व उत्तेजन देणे :  शिक्षा ः 1 वर्षापर्यंतचा कारावास किंवा दंड किंवा दोन्हीही. 
गुन्ह्याची नोंद न करणे : शिक्षा ः 6 महिन्यांपर्यंतचा कारावास वा दंड वा दोन्हीही. 
बलात्कार :  शिक्षा ः किमान 7 वर्षे ते आजीवन कारावास व दंड. 
लैंगिक आघात :  शिक्षा ःकिमान 3 वर्षे ते 7 वर्षांपर्यंतचा कारावास व दंड. 
लैंगिक छळ : शिक्षा ः 3 वर्षांपर्यंतचा कारावास व दंड. 
अश्‍लील साहित्य बनविणे :  शिक्षा ः 5 वर्षांपर्यंतचा कारावास व दंड.