Sun, May 31, 2020 19:44होमपेज › Pune › राज्यात ६५ हजार निष्क्रिय संस्थांची नोंदणी रद्द

राज्यात ६५ हजार निष्क्रिय संस्थांची नोंदणी रद्द

Published On: Dec 31 2017 1:47AM | Last Updated: Dec 31 2017 1:35AM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी

संस्थेचे बदल अर्ज (चेंज रिपोर्ट) किंवा लेखापरीक्षण अहवाल (ऑडिट रिपोर्ट) दाखल न करणार्‍या पुणे विभागातील 9 हजार 639 संस्थांसह राज्यातील 65 हजार निष्क्रिय संस्थांची नोंदणी रद्द करण्यात आली आहे. धर्मादाय कार्यालयाने दिलेल्या आदेशानुसार 1 ते 30 डिसेंबरपर्यंत राज्यातील आठ सह धर्मादाय आयुक्तालयांनी मोहिमेद्वारे संस्था रद्द केल्या आहेत. 

सामाजिक कार्य करण्यासाठी राज्यात जवळपास साडेसात लाख संस्थांनी नोंद केलेली आहे. सर्व संंस्थांनी वर्षाकाठी धर्मादाय कार्यालयाकडे संस्थेचा सर्व हिशोब म्हणजे ताळेबंद सादर करणे आवशक आहे. 

गेली पाच वर्षे आणि त्यापेक्षा अधिक वर्षांपासून संस्थेचे विश्‍वस्त बदल, जमीन किंवा इतर प्रॉपर्टी खरेदी विक्री आदींचे बदल अर्ज दाखल करणे गरजेचे आहे. पण, बहुतांश संस्था नोंदणी केल्यानंतर धर्मादाय कार्यालयाकडे कागदपत्रे सादर करत नाहीत.अशा निष्क्रिय संस्थांच्या नोंदी ठेवणे आणि त्यांच्यासाठी प्रशासकीय कार्यवाही करण्यासाठी धर्मादाय कार्यालयाचा वेळ, पैसा आणि इतर बाबींचा खर्च होतो. 

याआधी या संस्थांची नोंद रद्द करण्याची तरतूद ‘महाराष्ट्र सार्वजनिक विश्‍वस्त कायद्यात’ नव्हती. पण, या कायद्यात सुधारणा करून ती तरतूद करण्यात आली आहे. म्हणून अशा संस्था शोधून त्यांची नोंद रद्द करण्याचे आदेश धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी ऑक्टोबरमध्ये दिले होते. तेव्हापासून राज्यातील आठ धर्मादाय सह आयुक्त कार्यालयांनी त्यांच्या अखत्यारीत असलेल्या जिल्ह्यातील सर्व संस्थांची यादी काढली.

यामध्ये जवळपास दीड लाख संस्थांची यादी धर्मादाय कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर आणि संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यांना कागदपत्रे दाखल करण्यासाठी एक महिन्याचा कालावधी देण्यात आला होता. ज्या संस्थांना कोणताही प्रतिसाद आला नाही, अशा 65 हजार संस्थांची नोंद रद्द करण्यात आल्याची माहिती धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी दिली.