Mon, Jun 17, 2019 21:23होमपेज › Pune › देहूरोडच्या धम्मभूमीवर लोटला जनसागर

देहूरोडच्या धम्मभूमीवर लोटला जनसागर

Published On: Dec 26 2017 1:33AM | Last Updated: Dec 25 2017 11:40PM

बुकमार्क करा

देहूरोड : वार्ताहर

येथील ऐतिहासिक धम्मभूमीवर सोमवारी आंबेडकरी जनसागर लोटला होता. या वेळी विविध संस्था, संघटना आणि राजकीय पक्षांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. बुद्धविहार कृती समिती, बुद्धविहार ट्रस्ट आणि धम्मभूमी सुरक्षा समितीच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.     

देहूरोड येथील ऐतिहासिक धम्मभूमीचा 63 वा वर्धापनदिन सोमवारी (दि.25) उत्साहात साजरा करण्यात आला. या वर्षीचा प्रबुद्धरत्न पुरस्कार माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांना प्रदान करण्यात आला. या वेळी माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे, बुद्धविहार कृती समितीचे अध्यक्ष टेक्सास गायकवाड, बुद्धविहार ट्रस्टचे अ‍ॅड. गुलाबराव चोपडे, गोपाल तंतरपाळे, पोलीस अधिकारी गणपत माडगूळकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरुण मोरे, धम्मभूमी सुरक्षा समितीचे अशोक गायकवाड, विजय लोखंडे, बापूसाहेब गायकवाड, धर्मपाल तंतरपाळे, तसेच महिला समितीच्या संगीता वाघमारे, मंदाकिनी भोसले, रंजना चव्हाण आदी उपस्थित होते.   

सत्यशोधक समाजाचे डी. एस. नरसिंगे (धम्मरत्न), बडोद्याच्या संकल्पभूमीचे मितेश एस. परमार (क्रांतिरत्न), के. चंद्रशेखर (साहित्यरत्न), महाराष्ट्रातील शिक्षक नेते अंबादास शिंदे (भीमरत्न) आणि उद्योगपती अविचल धिवार (उद्योगरत्न) यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. 

सकाळी आठ वाजता वैदर्भीय भीम सैनिकांनी शहरातून धम्मयात्रा काढली. पंचशील ध्वजारोहण, बुद्धवंदना आदी धार्मिक विधी झाल्यानंतर दुपारी मातंग धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. आमदार संजय भेगडे, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष विशाल खंडेलवाल, सदस्य हाजीमलंग मारिमुत्तू, राहुल बालघरे, सारिका नाईकनवरे यांनी सकाळी येथे अभिवादन केले. नागपूरचे भन्ते ज्ञानज्योती यांनी प्रवचन दिले. त्यानंतर पुरस्काराचा मुख्य सोहळा झाला. सायंकाळी भीमगीतांचा सुश्राव्य कार्यक्रम झाला. 

भारिप बहुजन महासंघ आणि बुद्धविहार ट्रस्ट, तसेच भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दलाच्या वतीने कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या वतीने मोफत वैद्यकीय सेवा पुरविण्यात आली. विविध संस्थांच्या वतीने अन्नदान करण्यात आले. पुस्तके, बौद्ध साहित्य, तसेच विविध गृहोपयोगी साहित्यांची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जात होती. पोलिसांच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

...असा आहे इतिहास

भारतात मूळ असलेला बौद्ध धम्म परदेशात मोठ्या प्रमाणात ख्यात झाला; परंतु भारतातून लयास गेला होता. सुमारे अडीच हजार वर्षांनंतर 1954 साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी रंगून (ब्रह्मदेश) येथून आणलेली बुद्धमूर्ती येथे स्थापना करून धर्मांतराच्या दिशेने पहिले पाऊल उचलले. बौद्ध धम्माला पुनर्जीवित करणारी देशातील ही पहिली बुद्धमूर्ती ठरली. डॉ. आंबेडकरांनी स्वतः धर्मांतरित होण्याच्या दोन वर्षे आधी ही मूर्ती प्रतिष्ठापित केली होती.