Mon, Aug 19, 2019 06:56होमपेज › Pune › 6014 गर्भवतींना स्वाइन फ्लूची लस

6014 गर्भवतींना स्वाइन फ्लूची लस

Published On: Jun 26 2018 1:16AM | Last Updated: Jun 25 2018 10:11PMपिंपरी : प्रतिनिधी 

पिंपरी- चिंचवड महापालिकेची आठही रुग्णालये आणि दवाखाने याठिकाणी स्वाइन फ्लूस प्रतिबंधक उपाय म्हणून गर्भवती आणि असाध्य रोग असलेल्या रुग्णांना मोफत स्वाइन फ्लूचे लसीकरणाची सुविधा उपलब्ध आहे. जानेवारी 2018 ते 25 जूनपर्यंत 6014  गर्भवती आणि 880 इतर असाध्य आजार असलेल्या रुग्णांना मोफत लसीकरण करण्यात आले आहे, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी दिली.

पावसाळा सुरू होण्यापूर्वी नागरिकांनी स्वाईन फ्लू लसीकरण करावे. त्यामुळे विषाणूंच्या वाढीसाठी पोषक वातावरणात नागरिकांना संरक्षण मिळेल असा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात येत आहे.  शहरात सध्या तरी स्वाइन फ्लूचा धोका नाही. मात्र, पावसाळ्याच्या सुरवातीला तापमान कमी होताच स्वाइन फ्लूच्या विषाणूंच्या संसर्गाचे प्रमाण वाढते. त्यामुळे नागरिकांनी त्यापूर्वी लस घ्यावी. लहान मुलांना ही लस देणे आवश्यक आहे. स्वाईन फ्लूचा सर्वाधिक धोका गर्भवतींना असतो. त्यामुळे वैद्यकीय सल्ल्यानुसार त्यांनीही लस घ्यावी असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांमार्फत करण्यात येत असते. गर्भवती महिलांची प्रतिकारशक्ती शरीरात होणार्‍या हार्मोन्सशी संबंधित बदलांमुळे कमकुवत होते.

खास करून गरोदरपणातील तिसरा टप्पा म्हणजेच 27 ते 40 व्या आठवड्यादरम्यान त्यांनी जास्त काळजी घेण्याची गरज असते. फुफ्फुस, किडनी किंवा हृदयविकार, मेंदूशी संबंधित (न्यूरोलॉजिकल) आजार आणि मधुमेह इत्यादी रुग्ण, गर्दीच्या ठिकाणी सातत्याने काम करणार्‍या लोकांनीही सावधगिरीचा उपाय म्हणून स्वाइन फ्लूचे लसीकरण करावे. तसेच पावसाळ्याच्या सुरवातीला तापमान कमी होताच स्वाइन फ्लूच्या विषाणूंच्या संसर्गाचे प्रमाण वाढते. त्यामुळे नागरिकांनी त्यापूर्वी लस घ्यावी. त्यासाठी अतिजोखमीच्या रुग्णांसाठी व गरोदर महिलांसाठी मोफत लसीकरणाची सुविधा महापालिकेच्या सर्व रुग्णालयांत करण्यात आली आहे.