Sun, Jul 21, 2019 08:29होमपेज › Pune › 600हून अधिक शिक्षकांच्या मान्यता रद्द

600हून अधिक शिक्षकांच्या मान्यता रद्द

Published On: Sep 05 2018 2:14AM | Last Updated: Sep 05 2018 2:14AMपुणे : प्रतिनिधी 

राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शासनाचे अनुदान घेऊन चालविल्या जाणार्‍या अनुदानित शाळांमध्ये नियमबाह्य पद्धतीने नियुक्‍त करण्यात आलेल्या 4 हजार 11 शिक्षकांपैकी जवळपास 3 हजार मान्यतांची चौकशी पूर्ण झाली आहे. यातील 1 हजार मान्यतांवर अंतिम निर्णय घेण्यात आला असून, काही मान्यता नियमित करण्यात आल्या आहेत. तर जवळपास 600 पेक्षा अधिक शिक्षकांची मान्यता रद्द करण्यात आली आहे. आता उर्वरित मान्यतांची चौकशी आणि निर्णयासाठी येत्या 15 ऑक्टोबरची डेडलाईन देण्यात आल्याची माहिती शिक्षण आयुक्‍त विशाल सोळंकी यांनी दिली आहे.

राज्यात नियमबाह्य पद्धतीने प्राथमिकच्या 488, माध्यमिकच्या 2 हजार 805 आणि उच्च माध्यमिकच्या 718 मान्यता देण्यात आल्या आहेत. या नियमबाह्य मान्यतांची व्हीआरएस म्हणजे रिक्‍त जागा, बिंदुनामावली आणि निवड प्रक्रिया यानुसार योग्य निवड प्रक्रिया पूर्ण झाली आहे का, याची चौकशी करण्यात येत आहे. परंतु, अपुर्‍या मनुष्यबळाअभावी ही चौकशी दिवसेंदिवस लांबणीवर पडत आहे.

मान्यतांच्या चौकशीप्रकरणी संबंधित अधिकार्‍यांनादेखील लेखी खुलासे मागविण्यात आले आहेत. जे अधिकारी  कामचुकारपणा करत आहेत त्यांच्यावरदेखील कारवाई करण्यात येणार आहे. ज्या मान्यता चुकीच्या पद्धतीने दिल्या गेल्या आहेत. त्या मान्यता रद्द करण्यात येतील. तसेच ज्या मान्यता पुनर्पडताळणीमध्ये योग्य सिद्ध होतील त्या शिक्षकांना कामावर कायम करण्यात येणार आहे. तर ज्या शिक्षकांच्या मान्यता रद्द करण्यात आल्या आहेत, अशा शिक्षकांचे पगार थांबविण्यात येणार आहेत. तशा प्रकारचे आदेशदेखील पे युनिटला देण्यात आले आहेत. ज्या शिक्षकांचे पगार थांबविण्यात येणार आहेत अशा शिक्षकांना कामावर ठेवायचे की नाही, याचा निर्णय संस्थाचालकांनी घ्यायचा आहे. उर्वरित शिक्षकांच्या मान्यतांची चौकशी होऊन दोषी शिक्षकांवरदेखील कारवाईचा बडगा उगारला  जाईल.