होमपेज › Pune › कृषी पदवीसाठी 60 हजारांवर अर्ज

कृषी पदवीसाठी 60 हजारांवर अर्ज

Published On: Jul 11 2018 1:38AM | Last Updated: Jul 11 2018 1:30AMपुणे : प्रतिनिधी

राज्याच्या चारही कृषी विद्यापीठांच्या अखत्यारित असलेल्या महाविद्यालयांमधील पदवी अभ्यासक्रमासाठी ऑनलाइन प्रक्रियेद्वारे 64 हजार 619 अर्ज परिषदेस प्राप्त झाले आहेत. सात अभ्यासक्रमांसाठी 11 जून ते 7 जुलैदरम्यान ही प्रवेश प्रक्रिया पार पडली. राज्यातील चार कृषी विद्यापीठांतर्गत महाविद्यालयांची संख्या 174 असून त्यामध्ये 15 हजार 227 जागा उपलब्ध आहेत. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ (दापोली), वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ (परभणी), डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ (अकोला), महात्मा फुले कृषी विद्यापीठ (राहुरी) या चार विद्यापीठांतर्गत पदवी अभ्यासक्रम चालविण्यात येतो. कृषी, कृषी व्यवसाय व्यवस्थापन, वनविद्या, उद्यानविद्या, अन्नतंत्रज्ञान, कृषी 

अभियांत्रिकी, जैवतंत्रज्ञान आदी 7 विषयांसाठी 11 जून ते 7 जुलैदरम्यान प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली होती. यामध्ये कृषी, कृषी व्यवसाय व्यवस्थापन व जैवतंत्रज्ञान आदी विषयांना विद्यार्थ्यांनी सर्वाधिक पसंती दिली आहे.  गतवर्षी सुमारे दहा अभ्यासक्रमांसाठी 57 हजार 431 अर्ज प्राप्त झाले होते. त्यांपैकी 51 हजार 822 अर्ज पात्र, तर 5 हजार 609 अर्जांना अपात्र ठरविण्यात आले होते. यंदाच्या वर्षीच्या प्रवेशाबाबतची राज्यस्तरीय गुणवत्ता यादी 13 जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांची अर्ज पात्र किंवा अपात्र याबद्दल माहिती उपलब्ध होणार आहे. काही कारणांमुळे अर्ज अपात्र असल्यास 14 ते 17 जुलै दरम्यान अर्जातील अभावाची पूर्तता करता येणार असल्याची माहिती महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे संचालक डॉ. हरिहर कौसडीकर यांनी दिली.