Thu, Jul 18, 2019 04:30होमपेज › Pune › एसटीच्या महिला वाहकांना 6 महिन्यांची प्रसूती रजा 

एसटीच्या महिला वाहकांना 6 महिन्यांची प्रसूती रजा 

Published On: Mar 25 2018 4:06PM | Last Updated: Mar 25 2018 4:06PMपुणे: प्रतिनिधी 

राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) महिला वाहकांना सहा महिन्यांची (180 दिवस) प्रसूती रजा मंजूर केली असून याबाबत सर्व आगारांना सूचित करण्यात आले आहे. याची अंमलबजावणी सुरू करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. त्याचप्रमाणे उत्तम कामगिरी करणार्‍या महिला वाहकांना तीन महिन्यांची (90 दिवस) अतिरिक्त खास प्रसूती रजा देखील मंजूर करण्यात आली आहे. प्रसूती रजा संपल्यानंतर आवश्यकता भासल्यास महिला वाहकांच्या खाती जमा असणारी सरासरी वेतनावरील रजा वैद्यकीय प्रमाणपत्र सादर न करता देखील उपभोगता येणार आहे. मानसेवी वैद्यकीय अधिकार्‍यांच्या सल्ल्यानुसार प्रसूती रजेपैकी किती व कोणत्या कालावधीत रजा घ्यावी हे ठरविण्याचा अधिकार संबंधित महिला वाहक कर्मचार्‍याला असणार आहेत, असेही सांगण्यात आले. 

दरम्यान, गरोदरपणाच्या कालावधीत पहिल्या चार महिन्यांपर्यंत मानसेवी वैद्यकीय अधिकारी व स्त्री रोग तज्ज्ञ यांच्या वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारे महिला कर्मचार्‍याची शैक्षणिक पात्रता बघून बैठे काम देण्याचा निर्णय विभागीय पातळीवर घेण्यात यावा, असे सूचित करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे महिला वाहक कर्मचार्‍यास गरोदरपणाच्या कालावधीत काही ठराविक महिन्यांपर्यंत सुरक्षित, सुस्थितीत असलेल्या मार्गावर पाठविण्यात यावे, तसेच ग्रामीण भाग, कच्चे रस्ते असणार्‍या भागांत त्यांना पाठविण्यात येऊ नये, असा आदेश काढण्यात आल्याची माहिती देण्यात आली.


Tags : Pune, News, Womens, ST, Maternity live, Maharashtra State Road Tranceport Carporation