Sun, May 26, 2019 16:39होमपेज › Pune › आरोग्य विभागात ५९८ पदे रिक्त

आरोग्य विभागात ५९८ पदे रिक्त

Published On: Dec 31 2017 1:47AM | Last Updated: Dec 31 2017 12:36AM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी 

महापालिकेच्या आरोग्य विभागात क्लास वन पासून शिपायापर्यंतची 598 पदे रिक्त असून, वर्षानुवर्षे ती रिक्त राहत असल्याने आरोग्य विभागाच्या कामकाजावर परिणाम होत आहे. इतकेच नव्हे तर महापालिकेचे आरोग्यप्रमुखपद गेल्या सात वर्षांपासून रिकामे आहे आणि सध्याही ते कधी भरले जाईल याची शाश्‍वती नाही. 

महापालिकेच्या आरोग्य विभागाचे 45 दवाखाने, 17 प्रसूतिगृहे आणि एक सांसर्गिक रुग्णालय आहे. आरोग्य विभागासाठी 1663 मनुष्यबळ आहे; पण यापैकी केवळ 1145 पदे भरलेली असून, उरलेली 598  पदे रिक्त आहेत. यामुळे शहराच्या आरोग्यविषयक कामांवर परिणाम होत आहे. यामुळे दवाखान्यांत विशेषज्ञ डॉक्टर, नर्स, कार्यालयीन स्टाफ, शिपाई आदींची संख्या अत्यंत कमी आहे. 

पालिकेच्या दवाखान्यांत वैद्यकीय अधिकारी आणि प्रसूतिगृहांत स्त्रीरोगतज्ज्ञांची संख्या  वगळता इतर विषयांचे स्पेशालिस्ट डॉक्टरांची संख्या अत्यंत कमी आहे. यामध्ये नेत्रतज्ज्ञ, हृदयरोगतज्ज्ञ, त्वचारोगतज्ज्ञ आदी विशेषज्ज्ञांची संख्या कमी आहे किंवा काही ठिकाणी ती नाही. यामुळे चांगल्या आरोग्य सुविधा देण्यात अडचणी येत आहेत. 

पाठपुरावा करूनही पदभरती नाही

आरोग्य विभागातील रिक्त पदे ही वर्षानुवर्षे तशीच असून, ती भरण्यासाठी आरोग्य विभागाकडून आयुक्तांकडे प्रत्येक वर्षी प्रस्ताव देण्यात येतो. मात्र तरीदेखील पदांची भरती केली जात नाही. यामुळे आरोग्य अधिकार्‍यांचे मनोधैर्य देखील खचले आहे.

कर्मचारी बदल्यांसाठी दबाव

आरोग्य विभागातील आहे त्या कर्मचार्‍यांच्या बदल्या करून घेण्यासाठी आरोग्य अधिकार्‍यांच्या कामात माननीयांचा हस्तक्षेप आणि दबाव येतो. यामुळेदेखील आरोग्य विभागात कर्मचार्‍यांचे नियोजन करण्यात येत नसल्याचे आरोग्य अधिकारी खासगीत सांगतात.