५३ बिल्डरमागे ‘आयकरा’चा फेरा

Last Updated: Feb 19 2020 2:01AM
Responsive image


पुणे : पांडुरंग सांडभोर
शहरातील तब्बल 53 विकसक व बांधकाम व्यावसायिक  (डेव्हलपर, बिल्डर) आयकर विभागाच्या (इन्कम टॅक्स) रडारवर आले आहेत. या सर्व बिल्डरांच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी आयकर विभागाने सुरू केली आहे. त्यासाठी महापालिकेकडून या 53 बिल्डरांच्या बांधकाम प्रकल्पांची माहिती  मागविण्यात आली आहे. यामध्ये काही बड्या बिल्डरांचाही समावेश आहे. 

आयकर विभागाने महापालिकेला पाठविलेल्या पत्रात  53 बिल्डरांची यादी त्यांच्या व्यावसायिक पॅन क्रमांकासह पाठविली आहे. महापालिकेने सन 2016- 17 या आर्थिक वर्षात काम पूर्ण झाल्याचा दाखला दिलेल्या या बिल्डरांच्या बांधकाम प्रकल्पांची चौकशी केली आहे. शिवाय,  या 53 बिल्डरांच्या सध्या सुरू असलेल्या बांधकाम प्रकल्पांचीही   इत्यंभूत माहिती आयकर विभागाने मागविली आहे. या बिल्डरांच्या  आर्थिक विवरणपत्राच्या तपासणीत काही त्रुटी आढळून आल्याने त्यांची आयकर चौकशी सुरू झाली आहे, त्यामुळे या बिल्डरांचे धाबे दणाणले आहेत.   

आयकर विभागाचे हे पत्र महापालिका आयुक्तांकडून पॅन तपशीलाच्या यादीसह बांधकाम विभागाकडे पाठविण्यात आले आहे. त्यानुसार, बांधकाम विभागाकडून ही माहिती संकलित करून आयकर विभागाला पाठविण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. मात्र, त्याबाबत गोपनीयता बाळगण्यात येत आहे.  

लपवा-छपवी येणार चव्हाट्यावर
आयकर विभागाचे आर्थिक विवरणपत्र भरताना अनेकदा माहितीची लपवा-छपवी केली जाते. त्या माध्यमातून प्रामुख्याने कर वाचविण्याचा प्रयत्न केला जातो. बिल्डरांनी केलेली हीच लपवा-छपवी या चौकशीतून चव्हाट्यावर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.