Fri, Jul 19, 2019 05:04होमपेज › Pune › ५२ वे मराठी विज्ञान अधिवेशन कुडाळ येथे 

५२ वे मराठी विज्ञान अधिवेशन कुडाळ येथे 

Published On: Dec 09 2017 1:45AM | Last Updated: Dec 09 2017 12:26AM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

मराठी विज्ञान परिषद, मुंबई आणि वसुंधरा विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने 52 वे अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशन भरविण्यात आले आहे. दि. 16 डिसेंबर ते दि. 18 डिसेंबर 2017 या कालावधीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील वसुंधरा विज्ञान केंद्रात हे अधिवेशन भरणार आहे. अधिवेशनाचे अध्यक्षस्थान पर्यावरण अभ्यासक डॉ. उल्हास राणे भूषविणार आहेत, तर उद्घाटन गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आणि ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या हस्ते होणार आहे.

स्वागताध्यक्षपदी वसुंधराचे संस्थापक सी. बी. नाईक व विज्ञान परिषदेचे डॉ. ज्येष्ठराज जोशी हे आहेत. अधिवेशनाचा समारोप केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या उपस्थितीत होणार आहे, अशी माहिती वसुंधरा विज्ञान केंद्राचे व्यवस्थापकीय विश्वस्त अविनाश हावळ, विज्ञान परिषद, पुणेचे कार्याध्यक्ष विनय र. र. यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी नीता शहा, सुरेश पटवर्धन, गीता महाशब्दे व संजय मालती कमलाकर उपस्थित होते. 

अविनाश हावळ म्हणाले, या अधिवेशनात भारतभरातून विविध विषयांतील जेष्ठ शास्त्रज्ञ व विचारवंत यामध्ये सहभागी होणार आहेत. अधिवेशनाची यंदाची संकल्पना ’जैवविविधता संवर्धनातून शाश्वत जीवनमान’ अशी असून, एकूण पाच परिसंवादांचे आयोजन करण्यात आले आहे.यात’सागरी परिसंस्था’, ’शाश्वत शेती समस्या व उपाय’, पश्चिम घाटातील जैवविविधता संवर्धन मोहिमेची माहिती अशा विविध विषयांवर परिसंवाद होणार आहे.

यामध्ये राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्थेचे उपसंचालक डॉ. बबन इंगोले, गोदरेज अ‍ॅण्ड बॉईसच्या कांदळवन प्रकल्पाचे व्यवस्थापक लक्ष्मीकांत देशपांडे व संशोधक मयुरेश गांगल, वन्यजीव व वनस्पतीशास्त्र अभ्यासक डॉ. बिभास आमोणक  आदी मान्यवर  सहभागी होणार आहेत.  महिलांच्या रोजच्या दिनक्रमात सहाय्यभूत होणार्‍या, नाविन्यपूर्ण वस्तू आणि त्यावर आधारित उद्योग या विषयांवर आधारित परिसंवादामध्ये डॉ. प्रियदर्शनी कर्वे इंधनाचा प्रभावी आणि कार्यक्षम वापर यावर मार्गदर्शन करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.