Sat, Aug 24, 2019 23:39होमपेज › Pune › शास्तीकर माफीमुळे ५२ कोटींचे नुकसान 

शास्तीकर माफीमुळे ५२ कोटींचे नुकसान 

Published On: May 31 2018 1:45AM | Last Updated: May 30 2018 11:37PMपिंपरी : मिलिंद कांबळे

पिंपरी-चिंचवड शहरातील 600 चौरस फूट आकाराच्या निवासी बांधकामांना शास्तीकर माफीचा लाभ मिळणार आहे. त्याचा फायदा 33 हजार 304 बांधकामांना होणार आहे. मात्र, त्यामुळे 1 एप्रिल 2012 ते 31 मार्च 2017 पर्यंत शास्तीकराची थकबाकी असलेल्या 51 कोटी 40 लाख 58 हजारांचे पालिकेचे आर्थिक नुकसान होणार आहे.

शहरात एकूण 79 हजार 774 अनधिकृत बांधकामांना शास्तीकर आहे. शासनाने पूर्वीच 600 चौरस फुटांपर्यंतच्या निवासी बांधकामांना शास्तीकर 11 जानेवारी 2017 च्या अध्यादेशानुसार माफ केला आहे. त्यानुसार एकूण 33 हजार 304 बांधकामांना दिलासा मिळाला आहे. त्यांच्याकडून 1 एप्रिल 2012 पासून येणे असलेली शास्तीकराची थकबाकी माफ झाली आहे. त्यामुळे शास्तीकर थकबाकी वगळून केवळ मिळकतकर त्यांना भरावा लागणार असल्याने त्यांना आर्थिक लाभ होणार आहे. परिणामी, नागरिक मिळकतकर भरण्यास पुढे येतील. मात्र, पालिकेचे सुमारे 52 कोटींचे नुकसान होणार आहे. 

601 ते 1 हजार चौरस फूट आकाराच्या निवासी बांधकामांना 50 टक्के शास्तीकर लागू आहे. पूर्वीपेक्षा शास्तीकर निम्मा केला आहे. त्याचा लाभ 19 हजार 485 बांधकामधारकांना 1 एप्रिल 2017 पासून मिळत आहे. त्यांच्याकडून शास्तीकराची पूर्वीची थकबाकी वसूल केली जाणार आहे. तसेच, 1 हजार 1 चौरस फुटांच्या पुढील निवासी बांधकामांना दुप्पटीने म्हणजे पूर्वीप्रमाणेच शास्तीकर भरावा लागणार आहे. त्यांना शास्तीकराची थकबाकीही भरावी लागणार आहे. अशा निवासी बांधकामधारकांची संख्या 17 हजार 929  आहे. निवासी बांधकामांना शास्तीकर असलेल्यांची एकूण संख्या 70 हजार 718 आहे. 

बिगरनिवासी, मिश्र व औद्योगिक अनधिकृत बांधकामधारकांची संख्या  9 हजार 56 आहे. त्यांना पूर्वीप्रमाणे दुप्पटीने शास्तीकर भरावा लागत आहे. अशी एकूण 79 हजार 774 शास्तीकर भरणार्‍या बांधकामधारकांची शहरात संख्या आहे. 

शास्तीकर माफी मिळणार म्हणून अनेक बांधकामधारक पालिकेकडे नोंदी करून याचा लाभ घेऊ शकतात. मात्र, त्यांना 31 डिसेंबर 2015 पूर्वीच्या बांधकामांची कागदपत्रे व पुरावे सादर करावी लागणार आहेत. तरच, त्यांना त्याचा लाभ मिळू शकणार आहे. 

शासन निर्णय प्राप्त झाल्यापासून अंमलबजावणी 

शासन निर्णयाची प्राप्त झाल्यानंतर त्यानुसार शास्तीकर माफीची प्रत्यक्ष अंमलबजावणी केली जाईल. त्यानुसार करसंकलन विभागाच्या संगणक प्रणालीत बदल केले जातील, असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे यांनी सांगितले. 

विरोधकांची सरसकट शास्तीमाफी फेटाळली

राज्य शासनाने 600 चौरस फुटांपर्यंत अनधिकृत निवासी घरांना शास्तीकर माफ, तर 601 ते 1 हजार चौरस फुटांपर्यतच्या अनधिकृत निवासी घरांना 50 टक्के शास्तीकर लागू करण्याचा अध्यादेश राज्यात 11 जानेवारी 2017 ला लागू केला. त्यावर पालिकेच्या 20 एप्रिल 2017 च्या सर्वसाधारण सभेत जोरदार चर्चा झाली. विरोधकांनी सरसकट पूर्णपणे शास्तीकर माफीची मागणी गेली. सत्ताधार्‍यांनी 600 ऐवजी 1 हजार चौरस फूट आकाराच्या घरांना शास्तीकर माफीचा निर्णय घेऊन तो शासनाकडे पाठविला.

त्यासंदर्भात शासनाने अद्याप काहीच निर्णय दिलेला नाही. मात्र, विरोधकांनी केलेल्या सरसकट शास्तीकर माफीचा निर्णय शासनाने फेटाळला असल्याचे मंगळवारच्या (दि.29) निर्णयावरून स्पष्ट होत आहे. दरम्यान, शासनाच्या अध्यादेशानुसार 600 चौरस फुटांच्या घरांना शास्तीमाफीची अंमलबजावणी 1 एप्रिल 2017 पासून पालिकेने सुरू केली. मात्र, शास्तीकराची 1 एप्रिल 2012 पासूनची मूळ थकबाकी वसुली सुरूच आहे. मिळकतकर भरताना पूर्वी थकीत शास्तीकर वसुल केला जात आहे. तसे बदल पालिकेने संगणक प्रणालीत केले आहेत.