Wed, Apr 24, 2019 11:29होमपेज › Pune › शनिवारवाड्यावर 51 फुटी स्वराज्य गुढी 

शनिवारवाड्यावर 51 फुटी स्वराज्य गुढी 

Published On: Jun 07 2018 2:08AM | Last Updated: Jun 07 2018 12:33AMपुणे : प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराज की जयचा घोष... 351 ढोल-ताशांची भव्य मानवंदना...पारंपरिक वेशात सुवासिनींनी केलेले औक्षण... मराठमोळ्या पुणेकरांचा जल्लोष आणि स्वराज्य गुढी उभारताना शिवज्योतींनी झालेली शिवरायांची महाआरती... अशा शिवमय झालेल्या उत्साहपूर्ण वातावरणात शिवरायांना मानवंदना देत 51 फूट स्वराज्य गुढी उभारून शिवराज्याभिषेक दिन शनिवारवाड्याच्या ऐतिहासिक प्रांगणात मोठ्या उत्साहात साजरा झाला.

शिवजयंती महोत्सव समितीतर्फे 345 वा शिवराज्याभिषेक दिन, स्वराज्य दिन, शिवशक प्रारंभ दिन, स्वराज्य नववर्षदिनी शनिवारवाड्याच्या प्रांगणात हा सोहळा पार पडला. या वेळी महापौर मुक्ता टिळक, इतिहासतज्ज्ञ पांडुरंग बलकवडे, धर्मराज हांडे महाराज, समितीचे संस्थापक अध्यक्ष व स्वराज्य गुढीचे संकल्पक अमित गायकवाड, समन्वयक सुनील मारणे, शिरीष मोहिते, नितीन पंडित, शांताराम इंगवले, फर्जंद चित्रपटातील कलावंत यासह असंख्य पुणेकर उपस्थित होते. 

शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळ्यातील सर्व स्वराज्य घराणी यांच्या हस्ते शिवछत्रपतींचा जिरेटोप, शिवमुद्रा, सुवर्णहोन, वाघनखे आणि जगदंब तलवार या पाच शुभचिन्हांनी अलंकृत भगव्या स्वराज्यध्वजासह ही स्वराज्य गुढी दिमाखात उभारण्यात आली. सोहळ्याचे यंदा 6 वे वर्ष असून शिवगर्जना, नादब्रह्म ट्रस्ट, नूमवीय, जय शिवराय, सह्याद्री गर्जना, रुद्र ्रगर्जना, शिवनेरी ही पुण्यातील नामांकित ढोलताशा पथके वादनात सहभागी झाली. पुण्यातील शिवाजी मर्दानी आखाड्यातर्फे शिवकालीन मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके करण्यात आली. अमित गायकवाड यांनी रचलेली श्री शिवछत्रपतींची आरती उपस्थित महिला भगिनींच्या हस्ते झाली. बाळासाहेब अमराळे, नीलेश जेधे, गोपी पवार यांनी प्रत्येकी 1 तोळा सोने समितीकडे सुपूर्द केले. 

या वेळी गायकवाड म्हणाले, श्री शिवछत्रपतींनी 6 जून 1674 रोजी हिंदवी स्वराज्य स्थापन करून भारताच्या गौरवशाली संस्कृतीचे खर्‍या अर्थाने रक्षण केले होते. त्यामुळे शिवराज्याभिषेक दिनाचे अनन्यसाधारण महत्त्व  देशवासीयांना समजावे, याकरिता 6 जून हा दिवस महाराष्ट्र शासनाने स्वराज्यदिन म्हणून जाहीर करावा. शिवराज्याभिषेक मनामनांत, शिवराज्याभिषेक घराघरांत ही संकल्पना समितीतर्फे आम्ही राबविण्याचे आवाहन केले होते. याला पुणेकरांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत घराघरांत हा दिवस साजरा केला आहे. कार्यक्रमाचे आयोजन अमित गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली राजाभाऊ ढमढेरे, सचिन पायगुडे, अनिल पवार, किरण देसाई, महेश मालुसरे, रवींद्र्र कंक, शंकर कडू, कुमार रेणुसे, गिरीश गायकवाड, दीपक घुले, किरण कंक, समीर जाधवराव, नीलेश जेधे, मंदार मते, मयूरेश दळवी यांसह असंख्य स्वराज्यबांधवांनी केले.