होमपेज › Pune › शनिवारवाड्यावर ५१ फुटी स्वराज्यगुढी

शनिवारवाड्यावर ५१ फुटी स्वराज्यगुढी

Published On: Jun 04 2018 1:30AM | Last Updated: Jun 04 2018 1:08AM



पुणे :प्रतिनिधी

शिवजयंती महोत्सव समितीतर्फे 345 वा शिवराज्याभिषेक दिन, स्वराज्य दिन, शिवशक प्रारंभ दिन, स्वराज्य नववर्ष दिन बुधवारी सकाळी 9 वाजता शनिवारवाड्यावर 51 फूट उंच स्वराज्यगुढी उभारून साजरा करण्यात येणार आहे. शनिवारवाड्याच्या प्रांगणात तब्बल 351 ढोल-ताशांच्या निनादात हा सोहळा होणार आहे.

महापौर मुक्ता टिळक, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे, शिवराज्याभिषेकाची पार्श्‍वभूमी असलेला, नुकताच प्रदर्शित झालेल्या फर्जंद चित्रपटातील कलाकार, समितीच्या शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळ्यात सहभागी झालेले सरदार, सुभेदार, मावळ्यांच्या वंशजांच्या हस्ते स्वराज्यगुढीचे पूजन होणार आहे, अशी माहिती समितीचे संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड यांनी दिली. सोहळ्याचे यंदा 6 वे वर्ष असून अमित गायकवाड यांनी रचलेली श्री शिवछत्रपतींची आरती उपस्थित महिला भगिनींच्या हस्ते होणार आहे. 

यावर्षी विविध संघटना, संस्थांच्यामार्फत दुर्गदुर्गेश्‍वर रायगड, लालमहाल, संभाजी महाराज पुतळा डेक्कन, नरवीर तानाजी मालुसरे चौक कोंढवा, चंद्रमौलेश्‍वर मंदिर हडपसर, वारजे चौक, नळस्टॉप चौक, 15 ऑगस्ट चौक, शिवणे गाव, नांदेड गाव, वीर बाजी पासलकर स्मारक, खेड-शिवापूर  यांसह विविध गावागावांत स्वराज्यगुढी उभारत शिवराज्याभिषेक दिन साजरा होणार आहे. 

समितीच्या वतीने दुर्गदुर्गेश्‍वर रायगड येथे साजरा होणार्‍या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रणवाद्य, सह्याद्रिगर्जना ही नामांकित ढोलताशा पथकेही मानवंदना देणार आहेत. कार्यक्रमाचे आयोजन अमित गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली राजाभाऊ ढमढेरे, सचिन पायगुडे, महेश मालुसरे, गिरीश गायकवाड, दीपक घुले, नीलेश जेधे, मयुरेश दळवी यांसह असंख्य स्वराज्य बांधवांनी केले आहे.

श्री शिवछत्रपतींचा जिरेटोप, शिवमुद्रा, सुवर्णहोन, वाघनखे आणि जगदंब तलवार या पाच शुभचिन्हांनी अलंकृत भगव्या स्वराज्य ध्वजासह ही स्वराज्यगुढी दिमाखात उभी राहणार आहे. शिवगर्जना, सह्याद्रिगर्जना, जय शिवराय, आम्ही नूमवीय, नादब्रह्म ट्रस्ट, रुद्रगर्जना, गुरुजी, शिवनेरी, समाधान ही पुण्यातील नामांकित ढोलताशा पथके वादनात सहभागी होणार आहेत. पुण्यातील शिवाजी मर्दानी आखाड्यातर्फे शिवकालीन मर्दानी खेळांची प्रात्यक्षिकेही सादर होणार आहेत.