Wed, Apr 01, 2020 00:57होमपेज › Pune › विभागातील रेल्वे स्थानकांवर ५०० सीसीटीव्हींची नजर

विभागातील रेल्वे स्थानकांवर ५०० सीसीटीव्हींची नजर

Published On: Dec 04 2017 1:36AM | Last Updated: Dec 04 2017 12:01AM

बुकमार्क करा

पुणे : निमिष गोखले 

प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेता व गंभीर गुन्हे घडू नयेत किंवा गुन्हेगारांना दहशत बसावी, या उद्देशाने मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने एक पाऊल पुढे टाकले आहे. कारण पुणे विभागांतर्गत येणार्‍या काही प्रमुख रेल्वे स्थानकांवर लवकरच ‘तिसरा डोळा’ अर्थात सीसीटीव्ही बसविण्यात येणार असल्याचे खात्रीलायक वृत्त दै. ‘पुढारी’कडे उपलब्ध झाले आहे. उपनगरीय स्थानकांवर तब्बल 500 सीसीटीव्ही बसविले जाणार आहेत.

यामुळे रेल्वे प्रशासनाला रेल्वे स्थानकांवर निगराणी ठेवण्यास मदत होणार असून, संशयित हालचाल टिपून त्वरित कारवाई करण्यासदेखील मदत होणार आहे. महिला आणि बालविकास मंत्रालयाने हे सीसीटीव्ही उपलब्ध करून देण्यास मोलाची मदत केली असून, ‘निर्भया’ निधीतून त्यांना मंजुरी मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महिलांवरील वाढते अत्याचार, मंगळसूत्र हिसकावणे, गाडी सुटण्याच्या ऐन वेळी प्रवाशाची बॅग किंवा पाकीट मारणे या प्रकारांमध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे रात्रीच्या वेळी अंधाराचा फायदा घेत 

लूटमारीचे प्रकारदेखील वाढले आहेत. या सर्वच गोष्टींवर ‘तिसरा डोळा’ची नजर असणे नितांत गरजेचे होते. पुढील वर्षी मे 2018 पर्यंत पुणे विभागातील सर्व प्रमुख रेल्वे स्थानकांवर टप्प्याटप्प्याने सीसीटीव्ही बसविले जाणार असून, गुन्हेगारी काही प्रमाणात कमी होण्यास निश्‍चितच मदत होणार आहे. दरम्यान, पुणे रेल्वे स्थानकावर सध्या 50 सीसीटीव्ही बसविण्यात आले असून, आणखी 45 सीसीटीव्ही पुढील 4-5 महिन्यांमध्ये बसविण्यात येणार असून, सीसीटीव्हींची संख्या शंभरवर जाणार आहे. वर्दळीच्या पुणे स्थानकावरून दररोज दोनशे गाड्या ये-जा करतात व तब्बल दोन लाख प्रवासी प्रवास करतात. पुणे शहर व स्थानक दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर नेहमीच राहिले असून, ‘तिसरा डोळा’मुळे 24 तास लक्ष ठेवण्यास मदत होणार आहे.