Thu, Apr 25, 2019 13:37होमपेज › Pune › सौरऊर्जा पॅनेलमुळे 50 किलो वॅट वीजनिर्मिती

सौरऊर्जा पॅनेलमुळे 50 किलो वॅट वीजनिर्मिती

Published On: May 13 2018 2:16AM | Last Updated: May 13 2018 12:40AMपिंपरी : मिलिंद कांबळे 

पिंपरी-चिंचवड महापालिका भवनाच्या छतावर सौरऊर्जा पॅनेल बसविण्यात आले आहेत. त्यातून दररोज 50 किलो वॅट वीज तयार होणार आहे. त्यामुळे पालिकेची वर्षाला 9 लाख रुपयांची बचत होणार आहे.  

पालिका भवनाच्या छतावर 1.8 चौरस मीटर आकाराचे एकूण 200 सौर पॅनेल बसविण्यात आले आहेत. हे काम नुकतेच पुुर्ण झाले आहे. येत्या आठवड्याभरात या दररोज तयार होणार्‍या 50 किलो वॅट वीजेसाठी महावितरणचे मीटर जोडण्यात येणार आहे. त्यानंतर वीज निर्मितीची प्रत्यक्ष वापर सुरू होईल. 

या पॅनेलसाठी एकूण 43 लाख रूपये खर्च आला आहे. पालिका भवनाला वीज ज्या वाहिनीतून पुरविली जाते त्या वाहिनीस तयार झालेली वीजेचा जोड दिला जाणार आहे. त्यातून ही वीज संपूर्ण इमारतीमध्ये वापरली जाईल. 

पालिका भवनासाठी महावितरण 9 रूपये 7 पैसे दराने वीज देते. वर्षाला सरासरी 7 ते 8 लाख युनिट वीज वापरली जाते. दरवर्षी साधारण 1 कोटी रूपये बिल वीजेपोटी येते. साधारण दिवसाला 2 हजार 200 युनिट वीज वापरली जाते. सौर पॅनेलमुळे दररोज तयार होणारी 50 किलो वॅटची (200 युनिट) बचत होणार आहे. सुटीच्या दिवशी तयार झालेली वीज महावितरणला वीज विकली जाईल. त्यामुळे पालिकेचे दरवर्षी  9 लाख रूपयांची बचत अपेक्षित आहे. त्यानुसार पॅनेलवर झालेला खर्च साडेचार वर्षांत वसुल होण्याची अपेक्षा आहे. 

यापूर्वी पालिकेच्या भोसरीतील ‘ई’ क्षेत्रीय कार्यालयावर 11 किलो वॅट क्षमतेचे सौर ऊर्जा पॅनेल वर्षांपूर्वी बसविण्यात आले आहेत. तयार झालेली वीज संबंधित कार्यालयात वापरली जात आहे.