Mon, May 20, 2019 20:49होमपेज › Pune › महापालिकेचे अंदाजत्रकही गडगडले

महापालिकेचे अंदाजत्रकही गडगडले

Published On: Jan 23 2018 1:25AM | Last Updated: Jan 23 2018 1:12AMपुणे : प्रतिनिधी

महापालिकेचे चालू वर्षाचे अंदाजपत्रक कोलमडल्याने पुढील वर्षाचे अंदाजपत्रकही गडगडले आहे. गतवर्षीच्या तुलनेत तब्बल 203 कोटींनी कमी असणारे व पुणेकरांवर करवाढ प्रस्तावित करणारे  2018-19 या आर्थिक वर्षाचे 5 हजार 397 कोटींचे अंदाजपत्रक आयुक्तांनी स्थायी समितीला सादर केले. पालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा पध्दतीने गतवर्षीच्या तुलनेत कमी रकमेचे अंदाजपत्रक सादर झाले आहे. 

महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी त्यांचे चौथे अंदाजपत्रक सोमवारी स्थायी समितीला सादर केले. आयुक्तांच्या पेटार्‍यात नक्की काय आहे, याबाबत उत्सुकता होती, मात्र आर्थिक मंदीमुळे महापालिकेचे उत्पन्न घटल्याने दरवर्षीच्या कोट्यवधींच्या उड्डाणांना ब्रेक लावण्याचे काम आयुक्तांना या अंदाजपत्रकात करावे लागले आहे. गतवर्षी (2017-18) आयुक्त कुमार यांनी 5 हजार 600 कोटींचे अंदाजपत्रक मांडले होते.

मात्र, चालू अंदाजपत्रकात जवळपास हजार ते बाराशे कोटींची अंदाजपत्रकीय तूट येणार असल्याचे स्पष्ट झाल्याने आयुक्तांनी पुढील वर्षाचे अंदाजपत्रक  तब्बल 203 कोटींनी कमी केले आहे.  हेच या अंदाजपत्रकाचे वैशिष्ट्य ठरले आहे. कोणत्याही नवीन योजना अथवा प्रकल्पांचा समावेश न करता चालू कामे पूर्ण करण्यावरच आयुक्तांनी भर दिला आहे. त्यात वाहतूक व्यवस्थेपाठोपाठ पाणी पुरवठा आणि पर्यावरण यांना या अंदाजपत्रक प्राधान्य देण्यात आले असून, त्यासाठी अधिकाधिक निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. 

या अंदाजपत्रकातील 60 टक्के निधी हा कर्मचार्‍यांचे वेतन, पेट्रोल, डिझेल तसेच इतर प्रकारच्या देखभाल दुरुस्ती अशा महसुली कामांवर खर्च होणार आहे, तर उर्वरित 40 टक्के निधी हा भांडवली विकासकामांवर खर्च होणार आहे. उत्पन्नाच्या जमा-खर्चाचा मेळ घालताना उत्पन्नाच्या प्रमुख बाबींमध्ये यामध्ये एकूण उत्पनाच्या 35 टक्के म्हणजे 1 हजार 882 कोटींचे सर्वाधिक उत्पन्न वस्तू आणि सेवा कराच्या माध्यमातून मिळेल असे अपेक्षित धरण्यात आले आहे.

तर मिळकत करामधून 1 हजार 699 कोटी, बांधकाम विकास शुल्कामधून 750 कोटी, पाणीपट्टी 339 कोटींचे उत्पन्न निश्‍चित धरण्यात आले आहे, तर खर्चाच्या प्रमुख बाबींमध्ये सेवकवर्गावर 1 हजार 650 कोटी आणि देखभाल दुरुस्तीसाठी 1 हजार 55 कोटी, वीज व दुरुस्ती खर्च 244 कोटी अशा प्रमुख बाबींचा समावेश आहे.

या अंदाजपत्रकामध्ये आयुक्तांनी मिळकतकरामध्ये 15 टक्के वाढ प्रस्तावित केली आहे. ही वाढ जर खाससभेने मंजूर केली तर 135 कोटींनी उत्पन्न वाढणार आहे. मात्र,  खाससभेने ही करवाढ फेटाळली तर अंदाजपत्रक आणखीच गडगडणार आहे, तर मुख्यसभेने मंजुरी दिली असल्याने पाणीपट्टीमध्ये वाढ होणार असून, यामधून 19 कोटींचे उत्पन्न अपेक्षित आहे.

दरम्यान, आयुक्तांचे अंदाजपत्रक घटल्याने आता स्थायी समितीसमोर प्रश्‍नचिन्ह उभे राहणार आहे. त्यामुळे स्थायीचे अंदाजपत्रकही 6 हजार कोटींचा टप्पा पार करू शकणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.