Thu, Apr 25, 2019 05:34होमपेज › Pune › डाळजजवळ अपघातात ५ ठार

डाळजजवळ अपघातात ५ ठार

Published On: May 19 2018 1:35AM | Last Updated: May 19 2018 1:24AMभिगवण : प्रतिनिधी

स्कॉर्पिओ गाडीचा टायर फुटून झालेल्या अपघातात पुणे (निगडी) येथील एकाच कुटुंबातील पाचजण जागीच ठार झाले आहे. यासह अपघातग्रस्त स्कॉर्पिओतील दोन व टाटा कंपनीच्या टियागो गाडीतील पाच असे सातजण जखमी झाले आहेत.  पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भिगवणजवळील डाळज नं. 1 येथे हा अपघात शुक्रवारी (दि. 18) सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास झाला आहे. मृत व जखमी हे तुळजापूर येथून देवदर्शनाहून परत येत असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला.

अपघातात आई, वडील, मुलगा, सून, नातू ठार झाले आहेत. यामध्ये प्रकाश रामचंद्र गायकवाड (67), सुनीता प्रकाश गायकवाड (58), संदीप प्रकाश गायकवाड (40), शीतल संदीप गायकवाड (32), अभिराज संदीप गायकवाड (5, सर्व रा. यमुनानगर, निगडी, पुणे) यांचा समावेश आहे, तर प्रमोद प्रकाश गायकवाड (32) व हेमा प्रकाश गायकवाड अशी गंभीर जखमींची नावे आहेत. स्कॉर्पिओतील ठार झालेले व जखमी हे तुळजापूरहून देवदर्शन करून  परत पुण्याकडे येत असताना हा अपघात झाला आहे. 

याबाबत थोडक्यात माहिती अशी की, स्कॉर्पिओ (एमएच 20 एजी 0939) ही सोलापूरहून पुण्याकडे येत असताना डाळज नं. 1 येथे आल्यानंतर गाडीचा टायर फुटला. त्यामुळे स्कॉर्पिओ पुणे बाजूची लेन सोडून सोलापूर दिशेच्या लेनवर आदळत गेली. यामध्ये गाडीचा अक्षरश: चुराडा होऊन यातील एकाच कुटुंबातील सातजण गंभीर जखमी होऊन पाचजण जागीच ठार झाले. तर दोघांना उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. यातील एका महिलेची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. 

दरम्यान, स्कॉर्पिओ दुसर्‍या लेनवर जाऊन आदळत गेल्याने पुण्याहून तुळजापूरलाच देवदर्शनासाठी निघालेल्या टियागो गाडीवर (एमएच 14 जीए 9835) आदळली. त्यामध्ये टियागो गाडीतील पाचजण जखमी झाले आहेत. त्यांची नावे बापू विश्‍वनाथ गुरव (52), कल्पना बापू गुरव (48), शार्दुल बापू गुरव (22), वैष्णवी बापू गुरव (20 सर्व रा. पिंपरी चिंचवड, पुणे) आणि सौरभ बजरंग गुरव (19, रा. शिवाजीनगर, पुणे) अशी आहेत.

हा अपघात एवढा जबरदस्त होता की, स्कॉर्पिओ गाडीचा चेंदामेंदा झाल्याने गाडीतील मृत व जखमी सर्वजण गाडीतच अडकून पडले होते. नागरिक, महामार्ग पोलिस व भिगवण पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्यांना बाहेर काढले. गाडीत अक्षरश: रक्ताचा सडा पडला होता.

तारलेही आणि मारलेही

स्कॉर्पिओ अपघातातील सर्वजण देवदर्शन करून परत येत होते. ज्यावेळी स्कॉर्पिओ टायर फुटून दुसर्‍या लेनवर गेली त्यावेळी टियागो गाडीवर जाऊन आदळली. यातील लोकही तुळजापूरलाच दर्शनासाठी निघाले होते. सुदैवाने टियागो गाडीतील एअरबॅग उघडल्याने ते जखमी झाले. अपघातग्रस्त दोन्ही गाड्यांतील लोक देवदर्शनानिमित्त प्रवास करीत होते. त्यामुळे हा अपघात काहींना तारणारा तर काहींना मारणारा ठरला.

मदतीला उशीरच

दरम्यान, स्कॉर्पिओ गाडीचा अपघात झाल्यानंतर डाळज येथील नागरिकांनी 108 रुग्णवाहिकेला फोन केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. मात्र प्रत्यक्ष मदत मिळण्यास अर्धा ते पाऊण तास वेळ गेल्याचे कळते. या उशिरा मदतीमुळे दोन जखमींना आपला प्राण गमवावा लागल्याची चर्चा उपस्थितांत होती. यामध्ये पाच वर्षीय अभिराज या बालकाचा समावेश आहे.